परीक्षित,

तुमची सूचना खूपच छान आहे, तशी मी ती आता अवलंबण्याचंही ठरवलं आहे. तिचा निबंध थोडा मोठा ( माझीच बहिण आहे ना ती ! ) असल्याने मला तो टायपून काढायला थोडा वेळ लागणार आहे, ते झालं की मी तो पीडीएफ स्वरुपात सर्वांना पाठवेनच.

ही गोष्ट माझ्याही लक्षात आली होती की सॉफ्ट कॉपीज जास्त लवकर प्रसारीत होऊ शकतात, पण मुद्रीतच स्वरूपात प्रकाशित करण्यामागे उद्देश हा होता-आहे की त्या दैनिकाची / साप्ताहिकाची / पाक्षिकाची / मासिकाची इ.इ. एकेक प्रत मी तिला परत पाठवू शकेन. ती जिथे रहाते तिथे आंतरजाल वगैरे गोष्टी तितक्याशा सहजी उपलब्ध नाहीत, त्यामुळे ती स्वतः असं काही प्रसारीत करू शकत नाही. दर वेळेस ती लिहील आणि मी प्रसारीत करेन, ही गोष्ट मला नको आहे. ( मी ते अगदी आनंदाने करेन, पण कोणालाही कुठल्याही गोष्टीसाठी कोणावर विसंबून रहावे लागणे मला अजिबात आवडत नाही. ) छापील स्वरूपात तिला सदरहू लेखन मिळाल्यास तिचा हुरूप वाढेल आणि मी तिला पत्तेही दिल्यास ती स्वतः तिथे तिचं साहित्य तिच्याच हस्ताक्षरात पाठवू शकेल.

खरं सांगायचं तर अगदी खूप मनापासून एकच इच्छा आहे की, तिचं अगोदरच प्रसिद्ध झालेलं लेखन अभिमानाने सर्वांना दाखवून मला म्हणायचंय की मी हिची बहिण आहे ना की मी स्वतः सर्वांना तिचं अप्रसिद्ध साहित्य पाठवून म्हणावं की ही माझी बहिण आहे !