श्रावणी यांच्या मुद्द्याच्या पुष्ट्यर्थ ओशोंनी या विषयाबाबत मांडलेले एक मत प्रस्तुत करतो.

अस्तित्वाचे सर्वच पैलू स्त्री आणि पुरुष अशा दोन भागात विभाजित केले जावू शकतात. स्त्री व पुरुष हे केवळ लिंगसापेक्ष विभाजन नव्हे. लाओत्सेंच्या म्हणण्याप्रमाणे स्त्री आणि पुरुष यांचे विभाजन जीवनाचा जो द्वंद्वात्मक विकास आहे त्याचा अविभाज्य भाग घटक आहे.

शारीरिक नव्हे तर मानसिक पातळीवरही स्त्री आणि पुरुष भिन्न आहेत. अस्तित्व ज्या ज्या अभिव्यक्तितून प्रकट होते त्या त्या ठिकाणी स्त्री आणि पुरुष हा भेद असू शकतो. परंतु लाओत्सेला समजून घेताना ही गोष्ट लक्षात ठेवायला हवी की पुरुष हे अस्तित्वाचे एक क्षणिक रुप आहे तर स्त्री हे शाश्वत रुप आहे. समुद्रात उसळणाऱ्या लाटेचे उसळणे क्षणिक असते. जेव्हा लाट नव्हती तेव्हाही समुद्र होता आणि जेव्हा लाट असेल तेव्हाही समुद्र असेल. स्त्रैणता हा अस्तित्वाचा सागर आहे, तर पुरुष हे अस्तित्वाचे क्षणिक रुप आहे. लाओत्से स्त्रैण अस्तित्वाला प्राथ्मिकता देतात. पुरुष त्यातून जन्म घेतो आणि त्यातच विलीन होतो. लाओत्सेंच्या या विचारात तथ्य आहे.