शिरीनताई,
आपल्यातल्या शिक्षिकेचे मनोगत कळल्याने बऱ्याच पालकांना (व भावी बापालाही!) ह्यांतून मार्गदर्शनपर काही मिळेल ही आशा !
आजच्या युगात पालकांनीच मुलांचे मित्र होण्याची आवश्यकता जास्त वाटू लागलेली आहे.
शिक्षणातल्या भयावह स्पर्धा, पालकांच्या मुलांकडून असणाऱ्या अवाजवी अपेक्षा, हातात खुळखुळणारा लक्ष्मीचा स्त्रोत, खऱ्या मित्रांपेक्षा संधीसाधू मित्र जास्त...... अशा अनेक  गोष्टी ह्याला कारणीभूत असाव्यात असे वाटते.
आईवडील नोकरीला जाताना वेळेअभावी पाचवीतल्या मुलाला बाहेर जेवण्यासाठी पैसे देतात ह्यात चूक कोणाची ? 
ज्या पौगंडावस्थेतल्या काळातून आई गेलेली असते त्या काळाबद्दल तिला कल्पना असतेच मग आपली १२वीतली मुलगी रोज कसल्या 'एक्स्ट्रॉ क्लासेस' ला जाते ह्याबद्दल तिने चौकशी करू नये ?
आपला कॉलेजला जाणारा मुलगा दोन चार वेळा पानाच्या गादीवर दिसल्यास त्याला वडिलांनी हटकावे की नाही ?
घरात फोन असतानाही मुले सार्वजनीक बुथ वरून फोन का व कोणाला करतात हे कळत नसावे पालकांना ?
ह्या उदाहरणांना देण्यात आलेली लंगडी कारणे समजून न येण्याइतपत पालक दुधखुळे आहेत का ?
सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या पाल्याचा विश्वास संपादन करणे हे महत्त्वाचे आहे. तो काय करतो, तिची मैत्रीण कुठे राहते, त्यांच्या मित्र मैत्रिणींच्या घरातले संस्कार काय आहेत, आज शाळेत-कॉलेजात काय केलेस ह्या जुजबी चौकश्या वरचेवर केल्यास बरेच प्रश्न सुटतील. हल्ली पालक-शिक्षक संघ असणे प्रत्येक शाळेला (मुंबईततरी) अनिवार्य आहे तेंव्हा वरचेवर होणाऱ्या त्यांच्या बैठकांना उपस्थित राहाणे किंवा शाळा कॉलेजात जाऊन मुलांच्या शिक्षकांना भेटण्यास लाज का वाटावी ?
मुले, मुली हाताबाहेर जाण्यापूर्वीच पालकच त्यांचे मित्र बनल्यास बरेच प्रश्न सुटतील असे माझे मत आहे.