वेदश्री,
माझ्या प्रतिसादाच्या आधी आलेल्या प्रतिसादाबद्दल थोडे लिहावेसे वाटते आहे. ते आधी लिहितो.
वेदश्री, तू मनोगतावर कविता प्रकाशित केलीस, हे धाडसी काम आहे. तू नेहमी कविता लिहीत नाहीस, कदाचित नव्यानेच हा छंद तुला लागला असावा. आपली कविता सगळ्यांसमोर मांडणे महत्वाचे असते. आता ती कविता वाचून प्रत्येक व्यक्तीच्या मनात वेगवेगळ्या प्रतिमा तयार होणार. कुणाला आवडणार कुणाला नाही. कुणी उत्तम म्हणणार कुणी टुकार म्हणणार.
कदाचित असाच (कवितेतला) अनुभव घेतला असलेली व्यक्ती अधिकच वेगळा प्रतिसाद देऊन जाईल.
आपली कविता आता तावून सुलाखून निघणार आहे हे समजून घेऊन मनाची तयारी खूप आवश्यक आहे. वाचकाला जर वेगळा अर्थ कळत असेल आणि त्याने तो सांगितला तर त्याचे खरे आभार मानायला हवेत. कदाचित तो अर्थ आपल्याला अभिप्रेत नसेल पण प्रथम वाचनात जर वाचकाला तो अर्थ वाटला तर ते त्या वाचकासाठी सत्य आहे. त्याला समजलेले सत्य. आपण जे म्हणतो तोच अर्थ वाचकाला कळायला लागला की आपली कविता बदलते आहे असे आपण समजू शकतो.
प्रत्येक प्रतिसादातून आपली कविता अधिक बोलकी कशी होईल याचे धडे घेता येतात. आता प्रत्येक जण निव्वळ टिका करायची म्हणूनच लिहेल असे नाही. छान छान म्हणणाऱ्या प्रतिसादांपेक्षा काय पटलं काय नाही, काय आवडलं काय नाही सांगणारे प्रतिसाद तुला नव्या गोष्टी शिकवतील.
आता माझे मत...
शेवटचे दोन कडवे काढून टाकले तर कवितेत अधिक जीव येईल. कुठे थांबायचे हे कळणे सुद्धा आवश्यक आहे. ही अश्या मुलीची कहाणी वाटते जिचा जीव एका मुलावर जडला आहे आणि ते सांगण्याची तिची हिंमत नाही. कदाचित स्वतःला कमी लेखण्याच्या सवयीमुळे असू शकते. ही न सांगता येण्याची भावना कवितेत बरीच व्यक्त झालीय. एक आणखीनही विचार आहे की आपल्याला काहीतरी बोलणे आवश्यक आहे. हे कळते आहे पण नकार भयामुळे वळत नाहीया.
एक चांगला प्रयत्न म्हणेन मी. लिखाण चालू ठेवावे ही आग्रहाची सूचना.
सौमित्र