चिरंजीव सौभाग्यवती सोनल,

तुझ्या मंगळसूत्राबद्दल असलेल्या भावना अगदी मंगलमय आहेत. ह्याबद्दल मी सर्वप्रथम तुझे कौतुक करतो.

पती पत्नीला मंगळसूत्र बांधतो तेंव्हा तो कोणता श्लोक म्हणतो आठव बरे.

माङ्गल्यं तन्तुनानेन मम जीवनहेतुना
कण्ठे बध्नामि सुभगे सञ्जीव शरदः शतम्

हे पवित्र सूत्र आहे. हे माझ्या आयुष्यासाठी महत्त्वाचे आहे. हे मी तुझ्या गळ्यात बांधतो. तू शंभर वर्षे सुखाने जग.

पती जिवंत असेपर्यंतच मंगळसूत्र गळ्यात घालावे. पतीच्या जिवंत असण्यातच पत्नीचे सौभाग्य सामावलेले आहे. पतीच्या निधनाने लग्न अमान्य होत नाही पण पत्नीचे सौभाग्य संपते. तिचे समाजातील स्थान संपत नाही पण तिच्या आयुष्यातील भौतिक सुखाचा काळ संपतो. त्यामुळे त्यानंतर तिने सौभाग्यालंकार घालू नये. पतीच्या जीवनात येण्याने ज्या ऐहिक इच्छा निर्माण होतात त्यांना आवर घालण्याची ही वेळ असते. त्यामुळे ज्याने अंगी वैराग्य उत्पन्न होईल असा साधा वेष, साधा आहार तिने करावा.

तू अधिकाराचा उल्लेख केला आहेस. तो बरोबरच आहे. तो सांसारिक सुखाचा अधिकार असतो. तो संपतो. म्हणून मंगळसूत्राचे प्रयोजन संपते.