वा चाणक्य!
आपण आमच्या मनातील विषयाला हात घातलात. त्याबद्दल आपले आभार!
मला माझ्या आजोबांनी या चिरंजीवांबद्दल जी माहिती सांगितली ती मला फार भावली. त्यांच्या विज्ञाननिष्ठ दृष्टीकोनातून त्यांनी ही माहीती सांगितल्याने अंधश्रध्दांवर विश्वास नसलेल्या माझ्यासारख्याला ती जास्त पटली असेल कदाचित. त्यातील आठवेल त्यातून संक्षिप्त विवरण येथे देण्याचा प्रयत्न करत आहे.
अश्वथामा - याने युध्दनियमांचे उल्लंघण करत पांडवांना झोपेत मारण्याचा प्रयत्न केला व चुकुन पांडवांचे पुत्र मारले गेले. त्यानंतर त्याने स्वरक्षणासाठी ब्रम्हास्त्र वापरून भुतलावरील जीवमात्रांना धोका निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
सारांश - अधर्माने/अनितीने व ठरलेल्या नियमांना तोडून जर तुम्ही वागाल तसेच स्वतःजवळ असणारी भयंकर शक्ति ईतर निरुपद्रवी प्राणीमात्रांच्या जीवावर बेतेल अशी वापराल तर तुम्हाला त्याची किंमत मोजावी लागेल. आश्वत्थाम्यानं ह्याच हुका केल्या म्हणून त्याला युगानुयुगे अखंड रक्तस्त्रावाच्या वेदना अशक्त शरिरावर सहन करत जगण्याची सामान्य माणसाच्या विचाराबाहेरची भयंकर सजा भोगावी लागली/लागत आहे, कधीही न संपण्यासाठी.
हनुमान - याने आपल्या प्रचंड शक्तिचा व बुद्धीचा यशस्वी वापर शेजारी राष्ट्राकडून स्वदेशावर आलेल्या संकटाविरुध्द लढण्यासाठी केला. तसेच आपल्या नेत्यावर पूर्ण विश्वास ठेऊन आपला नेता आदेश देईल त्या गोष्टीत यशस्वी होण्यासाठी पराकाष्ठा केली आणी ती सुध्दा कसल्याही स्वार्थाशिवाय!
सारांश - संकटाच्या वेळी तनामनाने जीवावर उदार होऊन, सर्व शक्ती व बुध्दी पणाला लावून जर तुम्ही मातृभूमीच्या हाकेला निस्वार्थ भावनेने ओ द्याल तसेच थोरामोठ्यांप्रती नम्र रहाल तर तुमचे नाव इतिहास देवाच्या बरोबरीने घेईल. तुमचा आदर्श युगानुयुगे समोर ठेवला जाईल.
तसेच रामायणकारांना हा ही संदेश द्यायचा असावा की एकहाती सर्वांना तारणारा हा तारणहार सदैव सद्गुणी लोकांसाठी जिवंत आहे.
परशुराम - ध्यानचिंतनाशिवाय जीवणात काहीही ध्येय नसणार्या या ब्रम्हचार्याने वेळ आल्यावर अन्यायी, गर्विष्ठ व प्रबळ सेनाधिशांविरुद्ध वेळोवेळी शस्त्र उपसून त्यांचा विनाश केला व तद्नंतर शांती स्थापन केली. अनेकवेळा विजयी झाल्यावर संपूर्ण भुतलावर अधिराज्य करण्याची संधि असूनही उचीत लोकांच्या हाती सत्ता देऊन सन्यस्त जीवन जगणारा परशुराम म्हणूनच सामान्य माणसाची भावना बनून भारतीय संस्कृतीत अमर आहे.
बिभिषण - स्वतःवर अन्याय होत असेल तर त्याविरुध्द दंड थोपटने हा मानवाचा गुणधर्म. पण कोणातरी परक्यावर अन्याय होत असेल व तो अन्यायी आपला स्वजन असेल तर त्याविरुध्द उभे राहने म्हणजे अनोखे दिव्यच व हे दिव्य बिभिषणाने केले. प्रत्यक्ष श्री. राम त्याच्या सोबत असल्याने त्याला यश मिळू शकले. पण पुन्हा भविष्यात कोणाला जर असे स्वजनांविरुद्ध उभे ठाकावे लागले तर तो एकटा पडू नये व त्याच्यासमवेत रामाचा दूत, समदुःखी बिभिषण आहे असे त्याने समजावे म्हणून बिभिषण अमर आहे. कदाचित आपल्या राजाचा अंकित/मांडलिक राजा शेजारदेशावर वैभवात व शांतीने राज्य करतो आहे हा स्वाभिमानात्मक मुद्दा समोर ठोऊनही समकालीन ग्रंथकारांनी बिभिषणाला अमरत्व दिलेले असावे.
बळी - (पुसटसे आठवत आहे) हा सामान्य कष्टकरी समाजातून स्वकर्तुत्वावर राजा झाला. जातीबंधांच्या अनिष्ठ प्रथांना तोडून याने प्रजेसाठी राज्य स्थापले.
व्यास व कृपाचार्य यांच्यावर प्रवासी किंवा इतर ज्ञानी मनोगती प्रकाश टाकतील अशी अपेक्षा.
या विषयावर मी माझ्या बालबुद्धिला पडलेला एक प्रश्न आजोबांना विचारल्याचा आठवतो. "जर कोणाला अमरच करायचे होते तर आपल्या संस्कृतीत सर्वोच्च मानलेल्या राम-कृष्णासारख्या ईश्वरावतारांनाच का अमर नाही केले?" ... असो.
चु. भु. द्या. घ्या.
आपला,
(सांस्कृतिक) भास्कर