संदर्भ - धर्मशास्त्रिय निर्णय (पं. धुंडिराजशास्त्री दाते), आर्यसंस्कृती (श्रीधरस्वामी) व शास्त्र काय सांगते भाग २-(वेदवाणी प्रकाशन).
हा उतारा वरील पुस्तकांतून मिश्रीत करून दिलेला आहे.
मंगळसूत्र व हिंदू परंपरा, चालीरीती वा रूढी ह्यांबद्दल काही गैरसमज दूर व्हावेत ह्या हेतूने येथे देत आहे.
---------------------------------------
"विधवा स्त्रियांनी सौभाग्यदर्शक हळद कुंकूम तिलक, सौभाग्यलेणी व सौभाग्यसंभार (काजळ, सिंदूर इ.) याचा उपयोग करू नये असा शास्त्र संकेत आहे पण काही ठिकाणी ह्या गोष्टींचा इतका अतिरेक केला जातो की विधवा स्त्री म्हणजे समाजातील एक बहिष्कृत, टाकाऊ घटक समजून त्यांना उपेक्षितांची वागणूक दिली जाते हे महाक्रौर्य आहे. विधवा स्त्रियांना पतिस्थानी परमेश्वराची सेवा करता येते व परमेश्वराच्या सेवेत षोडशोपचार पूजादेखील येते. शक्तिदेवता असेल तर तिला हळद कुंकू, ताडपत्र, काजळ इ. सौभाग्य-उपचार समर्पण करण्यास विधवांना कोणताही मज्जाव नाही. त्यांना काही प्रसंगी श्राद्धाधिकार देखील दिलेले आहेत. जेष्ठापत्यनिराजन (ज्येष्ठ अपत्याला आश्विन शुद्ध पौर्णिमेस ओवाळणे) व यमद्वितीयेस भ्रातृनिराजन (भावास ओवाळणे) ह्या गोष्टी अवश्य करता येतात. अशा वेळी ओवाळून घेणाऱ्या व्यक्तीस विधवा स्त्रियांनी कुंकूमतिलक लावण्यास कोणतीच हरकत नाही. विधवा स्त्रिया सुवासिनी म्हणून भोजनास जाऊ शकत नसल्या तरी त्या सुवासिनींना भोजन देऊ शकतात. विधवा स्त्रिया समोर येणे देखील अशुभ समजण्याची प्रथा सर्वथैव अज्ञानमुलक व निंद्य आहे.
विधवा स्त्रियांनी स्वतःचे कपाळ पांढरेफटक ठेवण्याऐवजी भ्रुकूटीमध्यात (कपाळावर-दोन भुवयांच्या मध्यभागी) बुक्का/काळा टिका/हळद/विभूती लावण्यास कोणतीही आडकाठी नाही. किंबहुना कपाळ तिलक विरहीत ठेवू नये असा संकेत आहे.
हल्ली शहरांत विधवा स्त्रिया वावरताना त्यांना समाज कंटकांपासून उपद्रव होण्याची शक्यता असते. अशा वेळी कपाळास तिलक व गळ्यात मंगळसूत्र घातल्यास हा उपद्रव टळू शकतो. विधवा स्त्रीने कपाळास तिलक लावला व गळ्यात मंगळसूत्र घातले म्हणून ती स्त्री पतित ठरू शकत नाही असे शास्त्र मानते. मनाने शुचिर्भूत असणाऱ्या विधवा स्त्रीने स्वतःच्या संरक्षणासाठी वरील दोन्ही गोष्टी केल्यास त्यामुळे शास्त्र नियमांचे उल्लंघन होत नाही.
ज्या घरांत पुत्रादी दुसरा कोणी कर्ता पुरूष नसतो किंवा कर्ता पुरूष काही कारणास्तव व्यग्र/व्यस्त असतो अशा घरात सर्व धार्मिक कृत्यांची जबाबदारी विधवा स्त्रियांनी सांभाळण्यास कुठलाही मज्जाव नाही. अशावेळी त्यांनी नित्य देवपूजा, गुढी, गणपती, जेष्ठा गौरी, चैत्र गौरी वगैरे कुळाचार अवश्य करावेत.
त्यांना स्वतःला सौभाग्यवायनांचा अधिकार नसतो परंतू कुळाचार कुळधर्म प्रसंगी त्यांनी सुवासिनींचा अवश्य सत्कार करावा. तिच्या हातून सत्कार करून घेण्यास सुवासिनीला संकोच वाटत असल्यास तिने देऊ केलेल्या वस्तू दुसऱ्या सुवासिनींच्या हस्ते स्वीकाराव्यात."
--------------------------------------
हिंदू धर्म कित्येक वर्षांपूर्वी पासून किती लवचिक होता ते ह्या १९५२च्या ग्रंथातून कळते. इतर धर्मांतले विडो किंवा बेवा स्त्रियांबद्दलचे अधिकार काय असावेत ह्याबद्दल कुतूहल आहे. कोणी येथे संदर्भांसहित दिल्यास उपकार होतील.