मंगळसूत्र घालण्यामागे, कुंकू लावण्यामागे शास्त्रीय कारण आहे का ते बघावे असा सूर काही जणांचा दिसला, त्याबद्दलचे माझे मत.
मंगळसूत्र घालण्याची सक्ती विवाहबंधनात अडकणाऱ्या दोघांपैकी केवळ एकाच व्यक्तीस असते ह्यावरूनच ह्यामागे काही शास्त्रीय कारण असे वाटत नाही. तसे असते तर ते 'मानवी शरीरास' लागू होणारे असल्याने दोघांना बंधनकारक ठरले असते. त्यामुळे मंगळसूत्र घालण्याचे कारण शास्त्रीय असण्यापेक्षा 'प्रतिकात्मक' आहे असे वाटते. नवराच ढळढळीत शेजारी उभा असला तरी लोकांच्या (ह्यात स्त्रियांची संख्या मोठी!!!) नजरा 'गळ्यात मंगळसूत्र आहे का?', 'कपाळावर कुंकू आहे का?', 'पायात जोडवी आहेत का?' अशा गोष्टींकडे असते. म्हणजे प्रत्यक्षाहून प्रतीके श्रेष्ठ अशातला प्रकार. असो.
कुंकू लावण्याने कपाळाच्या मध्यभागी असणारा कोठलासा बिंदू वा चक्र उद्दीपित होते, म्हणून कुंकू लावावे असे मीही वाचले/ऐकले आहे. मग माझा प्रश्न असा की हे चक्र वा बिंदू उद्दीपित करण्याची गरज केवळ स्त्रीवर्गालाच का? ह्यावर असेही उत्तर ऐकले आहे की "केवळ स्त्रीवर्गालाच कुठे? पुरुषानेही उभे वा आडवे गंध वा चंदनाचा टिळा लावण्याची प्रथा आहेच की". हे ऐकल्यावर मनांत प्रश्न येतो की कपाळावर आडवे/उभे गंध वा चंदनाचा टिळा लावण्याऱ्या पुरुषांची संख्या किती? तसे त्यांनी ते लावले नाही तर नाक मुरडणाऱ्यांची, नावे ठेवणाऱ्यांची संख्या किती? हेच स्त्रीने केले तर मात्र वेगळी परिस्थिती का? मुली लग्नाआधीही कुंकू लावतात. मात्र लग्न झाल्यावर तेच सौभाग्यप्रतीक बनते आणि विधवेला ते पुसावे लागते? असे कसे? लग्नाआधीपासून लावत असूनही लग्नाचा आणि कुंकवाचा संबंध का जोडला जातो?
दुसरा प्रश्न असा की उभे/आडवे गंध वा चंदनाचा टिळा लावणारे काही पुरुष आहेत. त्यांचे कपाळावरील बिंदू/चक्र उद्दीपित झाले असल्याने त्यांच्यात आणि न लावणाऱ्यांत काय फरक दिसतो? केवळ हिंदू स्त्रिया कुंकू लावतात, जगातल्या इतर असंख्य स्त्रिया लावत नाहीत. मग ह्या कपाळावरील बिंदू/चक्र उद्दीपित झालेल्या हिंदू स्त्रियांमध्ये आणि जगातील कुंकू न लावण्याऱ्या स्त्रियांमध्ये काही फरक आढळतो का? ज्यायोगे असे म्हणता येईल की ते चक्र वा बिंदू उद्दीपित होणे आवश्यक वा गरजेचे वा किमान चांगले असते?
माझ्या प्रश्नांची उत्तरे मिळाल्यास आनंद वाटेल.
कुंकू का लावावे चे उत्तर मी 'आवडते म्हणून', 'सवय झाली आहे म्हणून', 'चांगले दिसते म्हणून' यापैकी एक, असे म्हणते. कपाळावर योग्य जागी, चेहऱ्याला शोभेलश्या आकाराचे कुंकू लावल्यास बहुतांश स्त्रियांस ते चांगले दिसते असे माझे निरीक्षण आहे. चमकदार, विविधरंगी, अतिमोठे वा अतिलहान कुंकू लावून कदाचित चांगले दिसणार नाही, मात्र योग्य जागी, योग्य आकाराचे कुंकू लावल्याने स्त्री चा चेहरा वाईट दिसला असे होत नाही. कुंकू बहुतेकींना चांगले दिसते.