> काही महिला मंगळसूत्राला सौभाग्याचे लक्षण मानतात, तेंव्हा इतरांनी त्याचा मान राखावा, उगाच त्याला काही अर्थ नाही असे त्यांना पटवण्याचा प्रयत्न का करावा?
अहो इथे असा प्रयत्न कुणीच करत नाही आहे . उलट ज्या मंगळसूत्राला असे सौभाग्यलक्षण मानत नाहीत, त्यांना त्याचे महत्त्व पटवायचा प्रयत्न केला जात आहे.

> किंवा एकदा घातले, आता काढणार नाही असाही अट्टाहास का करावा? काही प्रथा प्रचलित आहेत आणि त्या अमानुष/अत्याचारी नाहीत तरीही विरोध का?
कुणी एखादीने नवरा हयात नसताना घातले मंगळसूत्र तर त्याचा इतर स्त्रियांना का त्रास व्हावा? त्यांच्यासाठी ते जितके महत्वाचे आहे तितकेच महत्व त्या विधवा स्त्रीलादेखील वाटत असेल तिच्या सौभाग्य अलंकाराचे. कदाचित आपल्या नवऱ्याच्या आठवणी जिवंत ठेवण्याचा तो एक प्रयत्न असेल, कदाचित काहीजणांनी लिहिल्याप्रमाणे सुरक्षेचा प्रश्न असेल, कदाचित केवळ दागिना ही भावनादेखील असेल. पण त्याचा इतर कुणाला त्रास व्हायचं कारण काय आहे? नवरा गेल्यावर त्या धक्क्यातून बाहेर येण्यापूर्वीच त्याच्या शवासमोरच जिला मंगळसूत्र काढायला सांगितले गेले आहे तिला ही प्रथा अमानुष वाटली असेलच की. माझ्या मामाच्या मृत्युनंतर मामीला मंगळसूत्र काढायला सांग म्हणून माझ्या आईच्या मागे लागले होते लोक, असेच शेजारी-पाजारी, ओळखीचे लोक ज्यांना काही हक्क नव्हता खरं तर नसते सल्ले देण्याचा. माझ्या आईने ठाम नकार दिला. मामा गेल्यावर काही दिवस मामी घालत होती मंगळसूत्र, मग हळूहळू दुःख निवळल्यावर तिनेहूनच काढून ठेवले ते. तो निर्णय तिचा होता, तिच्यावर लादला गेला नव्हता, म्हणून तिला तो अमानवी आणि अत्याचारी वाटला नाही. माझा विरोध अमानुषपणे प्रथा लादण्याला आहे.. एकीकडे त्यांचे पालन करणे, न करणे वैयक्तिक बाब म्हणणे आणि दुसरीकडे त्या न पाळणे म्हणजे सामाजिक भावनांशी खेळणे असे म्हणण्याला आहे.

तुम्ही म्हणता त्याप्रमाणे विदुषींनी त्याला विरोध केला नाही त्याचे कारण तेव्हा ह्या प्रथा अस्तित्वात नव्हत्या असेही असू शकेल. खाली वरदाताईंनी लिहिल्याप्रमाणे प्रतिकांना आलेले हे महत्व गेल्या काही शतकातली घटना असेल. कुंकू लावण्याने खरंच accupressure point कार्यान्वित होत असेल तरिही, कुमारिकासुद्धा कुंकू लावत असताना त्याचा सौभाग्याशी संबंध जोडणे विसंगत वाटते. प्रथा आहेत म्हणून त्या पाळल्या पाहिजेत असे म्हणणे तालिबानी आहे. त्यामागे कारणे असतील तर त्यांचा उहापोह केला गेला पाहिजे, पण वर लिहिल्याप्रमाणे ढळढळीत विसंगती असतानादेखील काही प्रथा आपण पाळत राहतो त्याला मात्र माझा विरोध आहे.