'भूतावर तुमचा विश्वास आहे का' हा प्रश्न एका पाश्चिमात्य प्रसिद्ध स्त्रीला (खूप वर्षापूर्वी ऐकले होते हे..त्यामुळे नाव आठवत नाही.)विचारला असता ती म्हणाली,'माझा भूतांवर विश्वास नक्कीच नाही,पण मला त्यांची भिती वाटते.'
आणि बरेच जण मनापासून कबूल करणार नाहीत,पण हीच स्थिती आपलीपण नाही का? 'भूत' हे अस्तित्व आपण मान्य करत नाही, पण त्याचबरोबर मुद्दाम जाऊन अमावस्येच्या रात्री एका ताज्या चितेसमोर रात्रभर मुक्काम सुद्धा करत नाही.
'भूत', अर्थातच रामसे बंधूंच्या चित्रपटात दाखवतात तसे हास्यास्पद नाही, पण मरणोत्तर आत्म्याचे अस्तित्व आहे हे सिद्ध करण्यासाठी शास्त्रज्ञानी इन्फ्रारेड कॅमेरा अथवा तत्सम उपकरणे वापरुन काही छायाचित्रे काढायचा प्रयत्नही केला आहे. या विषयावर संशोधने झाली आहेत. कारण 'भूत आहे' हा सिद्धांत पटत नसला तरी 'भूत(भूत म्हणण्यापेक्षा मरणोत्तर अस्तित्व) नाही' हे ते अजून ठोकपणे सिद्ध करु शकले नाहीत.  
माझा या विषयावर अभ्यास नाही, आणि 'भूत आहे कि नाही हे मी स्वत: खात्री करुन बघणार' हि वेडी जिद्द सुद्धा नाही. पण माझ्या मते 'भूत' ही 'आपल्याला पूर्णपणे माहीती नसलेला एक सिद्धांत' आहे आणि भिती आहे ती अनपेक्षिताची आणि अज्ञाताची.
नारायण धारपांच्या पुस्तकात याबद्दल एक वाक्य असते, जे मी मान्य करते, 'भिती हे भेकडपणाचे लक्षण मानले जात असले तरी काहीवेळा भितीच आपल्याला वेडी धाडसे करण्यापासून वाचवते.'
'भूत आहे' यावर माझा जसा विश्वास नाही तसाच 'भूत नाही' यावरही नाही. आणि या प्रश्नाचे ठाम उत्तर मिळवण्याची इच्छा माझ्यात नाही. मी भूताच्या गोष्टी चवीने वाचते ऐकते, कारण त्या मला आकर्षित करतात एखाद्या रंगीत आणि सुंदर नक्षीदार,पण विषारी सापाप्रमाणे. घाबरतेही, कारण त्या ऐकून घाबरते म्हणूनच मला त्या आवडतात. 
सो, मनोगतीनो, या पिळण्यामागचा पॉइंट हाच, कि 'भूत आहे/नाही' हा दीर्घ चर्चेचा विषय बाजूला ठेवून आपण आपले अनुभव सांगू, दुसर्‍यांचे ऐकू, क्षणभर घाबरु, नंतर विसरुन जाऊ.'डरने मे क्या हर्ज है???' भूत आहे/नाही यावर मते मांडण्यास रस असल्यास आपण तो एक स्वतंत्र चर्चेचा विषय म्हणून मनोगतावर आणू.
आपली(पिळू)अनु