उत्तर प्रदेशातल्या 'मदन मोहन शुक्ल' ह्या काँग्रेसी नेत्याने निवडणुक आयोगाकडे जया बच्चन व इतर स.पा. नेत्यांविरुद्ध लिखित तक्रार केली, त्यावेळी त्याला कदाचित आपण आपल्याच शेपटाला आग लावून घेतोय ह्याची तसूभरही कल्पना नसावी. दुसऱ्यांसाठी खड्डा खणणारे जेव्हा स्वतःच त्यात दफन होतात तेंव्हा तोंड मारण्याची कशी वेळ येते हे काँग्रेसी नेत्यांना आता चांगलेच समजलेच असावे.

जे अपेक्षित होते तेच घडले. संघवी व कपील सिब्बल सारखे महारथी कायदेतज्ञ गोलमाल भाषेत लाभार्थी पदांबद्दल (ऑफिस ऑफ प्रॉफिट) वक्तव्य करीत असतानाच संसदेत सोनिया व चॅटर्जी प्रभुतींच्या पदांवरून गदारोळ सुरू होता. ह्या गदारोळातच काँग्रेसने अधिवेशन आटोपते घेण्याची नवीन प्रथा सुरू केली.

३० वर्षांपूर्वी १९७५ सालात इंदिरा गांधींच्या राजकीय हिताचे संरक्षण करण्यासाठी लादण्यात आलेली आणीबाणी व आजची अधिवेशन स्थगित करण्याची परिस्थिती हेच दर्शवते की, काँग्रेसी कार्यकर्ते नेहरू घराण्यासाठी कुठलीही वैचारिक तडजोड स्वीकारण्यास तयार होतात. पंतप्रधानपद स्वीकारा म्हणून २००४ च्या मे महिन्यांत काँग्रेसींचा जो उरबडवेपणाचा 'रोड शो' झाला होता व आता जी नौटंकी होईल ते बघणे करमणूक करवून घेण्यासारखेच आहे.

राष्ट्रीय सल्लागार परिषदेच्या अध्यक्षा व इतर अनेक संस्थांवरील मानद अध्यक्षा म्हणून काम (?) करणाऱ्या सोनिया गांधींना बरीचशी पदे त्यागावी लागणार आहेत. त्यातले रा.स.प. च्या अध्यक्षतेच्या पदावरून हा गदारोळ उठला ! आता दोन्हीकडचा राजीनामा तर दिलेला आहेच, मग केंव्हाही परत रायबरेलीहून निवडणुक लढवीत मेंबर ऑफ पार्लीमेंट बनायला महाराणी मोकळ्या.... म्हणजेच परत जास्त 'मार्जीन' ने जिंकल्यावर मी केलेल्या त्यागाला व बलिदानाला लोकांनी कसे उचलून धरले ते सांगायला मोकळे-
ही तर काँग्रेस वर आलेली इष्ट आपत्तीच म्हणायची की !
ह्या किंवा असल्या कुठल्याही प्रकरणांत पुढील ६ वर्षे निवडणुक लढवण्यास मनाई करण्यात यावी अशी जनहित याचिका तोवर कोणी दाखल न केल्यास नवल !

भारतातली लोकशाही प्रगल्भ होतीच व मिडिया मुळे सर्वसामान्यांचा अजून फायदा होत आहे. सतत जागरूकता दाखवणारे विरोधी, अपक्ष व मित्र पक्ष कुठल्याही सरकारला ह्यापुढे मनमानी कारभार करू देणार नाहीत हे जवळपास स्पष्टच होत आहे. 
ह्या सर्व प्रकारांमुळे भारतीय जनता स्वतःच्या हक्कांबाबत थोडी जागरूक झाली तरच झाला प्रकार योग्य म्हणायचा.....
न पेक्षा 'गाढवापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बराच होता' असेच म्हणावे लागेल !