अनु,
भुते असतात यावर फ़ारसा कोणाचा विश्वास नसतो, तसा माझाही नाही. भुताटकीचे प्रकार म्हणजे सहसा अनाकलनिय अशा घटना असतात ज्यांचा खुलासा कधीच होत नाही आणि त्या घडल्या असल्या तरी त्यावर विश्वास बसणे कठिण असते. अशीच एक घटना मी अनुभवली आहे. भीतीदायक वगरे नाही पण आठवली की मी अजुनही अस्वस्थ होतो.
आमच्या कॉलेजचे वार्षीक स्नेहसंमेलन. आमचे ते शेवटचे वर्ष. अर्थातच उत्साह दांडगा. त्यात मी आणी माझे बरेचसे मित्र कौन्सील मेंबर, त्यामुळे सगळी धावपळ चालू होती. या वर्षीचे कार्यक्रम लक्षणिय ठरतील आणि नंतर्रच्या काही बॅचेस आपल्या बॅचची पुढील काही वर्षे आठवण काढतील असे काहीतरी करुन दाखवायची प्रत्येकाची इर्षा होती. पोरांनी कार्यक्रमांमधे व्यत्यय आणु नये, एखादा आय्टेम पाडाचा प्रयत्न होउ नये आणि बाहेरची मुले घुसु नयेत म्हणून जोरदर फ़िल्डिंग चालु होती. सतत स्टेज ते कॉलेजची इमारत अशा खेपा चालू होत्या. मधे एक नवी इमारत आणि पलिकडे आधीची मुख्य इमारत, दोहोंमध्ये लांबलचक कॉरिडॉर. साधारण ११ - ११.३० झाले असावेत. आता शेवट्चे काही कर्यक्रमच बाकी होते. मी स्टेज कडून मुख्य इमारतीकडे यायला निघालो होतो. एकटाच. अचानक कॉरिडॉर मध्ये त्या दोघी दिसल्या आणि मी अश्चर्याने व आनंदाने पटकन उदगारलो, 'तू?'
का? माजी विद्यार्थिनिंना प्रवेश नाही कि स्पेशल पास वगरे असेल तरच परवानगी? तिचे मिश्किल हास्याबरोबरचे उत्तर. मग अचानक तिने भिंतीकडे तोंड केले आणि बरोबरच्या मुलीला म्हणाली, चल. मी हात पकडुन तिला थांबवले. ती माझ्याच वर्गातली, खूप हुषार अभ्यासू तरीही सर्वांशी साधेपणे बोलणारी. बारावी नंतर ती मेडिकलला गेली. अधे मधे भेटलीही असेल, पण आज मात्र जवळ जवळ दिड - दोन वर्षानी भेटत होती. म्हणाली, मी तुझ्यावर रागावल्ये. त्या दिवशी रस्त्यात दिसलास, मी आपली हात करत्ये तर तू बघीतलच नाहीस. मी जिभ चावली, कदाचित तसे झालेही असेल. नसेल माझे तेव्हा लक्ष. मी सॉरी म्हंटले तर लगेच म्हणाली अस नुसत सॉरी नाही चालणार. ठीक आहे, मी म्हणालो. मी पेनल्टी देतो. चल. मस्त कॉफ़ी घेउ. तीही म्हणाली , चालेल. बघू कशी आहे तुझी कॉफ़ी. एवढ्यात. आमच्या नावाचा हाकारा ऐकू आला. स्टेज वर येण्याची दवंडी माझ्या नावे पिटली जात होती. मी तिला म्हणालो, जरा थांब. इथे कुठे भटकत आहात तुम्ही? तिकडे आपल्या ग्रुप मध्ये जा, मी काय काम आहे ते बघून येतो. मी स्टेज कडे धावलो. काहितरी काम निघाले होते. कुणीतरि हजर नव्हते मग कर्यक्रम मागे - पुढे वगरे सरकावले वगरे वगरे. मग निर्णय जाहीर झाले. आमच्या वर्गाच्या एकांकीकेला परितोषीक मिळाले होते. त्याचा जल्लोश झाला. मग तेवढ्यात तिची आठवण झाली. मनात म्हंटले आता पुन्हा हजेरी घेणार. बर्याच जणींना विचारले पण कुणीही सांगु शकले नाही. मग आवराअअवर करुन सगळी गँग सगळे सुरळीत पार पडल्याच्या समाधानात आणि विजयाच्या आनंदात निघाली. शिरस्त्या प्रमाणे स्टेशन ला गेलो. राज पुरी हाउस चा अपरात्री मिळणारा चहा घेतला आणि १.४० च्या शेवट्च्या कर्जत लोकलमध्ये कल्याण डोंबिवली च्या मुलांना टाटा करून २-२.३० ला घरी पोचलो.
मस्त झोपेत असताना आइने उठवले. अस्मादिकांनी हक्काच्या आइवर आवाज लावला कि आज सुटी आहे, काल जागरण झाले आहे तर सकाळी ८ नाही वाजले तर कशाला उठवता? कळले की आमचेच एक मित्रवर्य उपट्ले आहेत. मनात त्याला मराठीतले काही प्रेमळ शब्द वापरत बाहेर आलो तर चिरंजीव टर्मिनल चा 'निकाल' लागल्यासारखा चेहेरा करून बसलेले. त्याने सांगीतले कि लगेच बाहेर पड. का ते वीचारू नकोस. बाहेर पडलो. थोडे पुढे आल्यावर म्हणाला अरे एक वाइट बातमी आहे. आपल्या वर्गात 'ती' होती ना, नंतर मग मेडिकलला गेली बघ,......................... तीनी काल रात्री आत्मह्त्त्या केली. काल रात्री. तिने झोपेच्या गोळ्या घेतल्या आणि सगळे खलास. मी भडकलोच त्याच्यावर, 'क्ष्क्ष्क्ष्क्ष्क्ष्क्ष्क्ष, अरे नाही पेलत तर कशाला पीता रे इतकी? गाढवा सारखा काहीतरी बरळतोस मुर्खा, म्हणे ती ... नो. ती काल रात्री मला भेटली, आम्ही कॉफ़ी घ्यायला जाणार होतो पण चुकामुक झाली. आता तु काहीतरी सांगतोस, अरे नीट चौकशी तरी कराची ना?
पण ते खरे होते. काय नक्की कारण घडले ते माहीत नाही, त्या बद्दल दोन तीन प्रवाद होते. पण ती त्याच रात्री गेली हे खरे होते. विचार करून मेंदुला मुंग्या आल्या. सगळे घटनाक्रम पुन्हा पुन्हा जुळवाचा प्रयत्न केला. पण गणित जमत नव्हते. स्वत: मेडिकलची स्टुडण्ट. कुठल्या औषधाचा लिथल डोस किती आणि परीणाम व्हायला किती वेळ लागतो हे तिला माहीत असणारच. पण तरीही प्रश्न उरतोच कि इतक्या गोळ्या घेतल्या असतील तर तीच्यावर काहीच परिणाम कसा झाला नव्हता? ती घरपर्यंत कशी पोचली असेल? तीला बाकी कुणीच कसे पाहीले नाही? मी स्वत: तिच्याशी बोललो, तिचा हातही धरला होता म्हणजे तो भास नक्कीच नव्हता. मी तीला म्हणालो होतो कि आता पुन्हा कधीही दिसलिस आणि जरी तुझे लक्ष नस्ले तरी मी गाठीन आणि ओळख देइन म्हणजे तुला तक्रारीला चान्सच मिळणार नाही. पण आता ती कधीच भेटणार नव्हती.