अनु, नेहमी प्रमाणेच फक्कड कथा दिल्याबद्दल आभार!

मी तुमचा फार जुना वाचक आहे परंतू आज पहिल्यांदाच प्रतिसाद देतो आहे.

सुदैवाने मी कधीही अशा त्रासातून गेलेलो नाही. परंतू आमच्या घरातले सगळे जन यातून गेले आहेत/जात आहेत. खरे तर बहुतेक भारतीयांच्या बाबतीत हे घडतेच आणि त्याचे मूळ शोधण्यासाठी जर थोडा अभ्यास केलात, निरीक्षण केले तर काही मुद्दे ठळकपणे लक्षात येतात...

आपण भारतीय लोक (व कधी कधी दंतवैद्य सुद्धा!) दातांच्या आरोग्याबद्दल बऱ्यापैकी उदासीन असतो. आपणास हे माहीत असते का?

१. आपले आरोग्य हे जसे आहार, व्यायाम व निद्रा या बाबींवर अवलंबून असते तसेच ते दातांच्या आरोग्यावर सुद्धा अवलंबून असते. दातांमध्ये जिवाणूंची वाढ फार झपाट्याने होत असते व ते अन्नच्या प्रत्येक घासासोबत, पाण्याच्या प्रत्येक घोटासोबत आपल्या पोटात जाऊन आरोग्यावर प्रहार करत असतात.
२. सहा महिन्यांतून कमीत कमी एक वेळेला दात वैद्याकडून स्वच्छ करून घेतले नाहीत तर ते किडण्याची दाट शक्यता असते. 
३. आपल्या शरीरात काही बिघाड झाल्यास त्याची सर्वांत प्रथम माहिती आपल्याला वा आपल्या डॉक्टरांनाच येते मात्र आपल्या दातांची दुर्गंधी मात्र प्रथम इतरांना येते व त्यामुळे विचित्र परिस्थिती निर्माण होते.
४. अधून मधून कच्चे हरबरे, मूग, मटकी, डाळी, ऊस, असे दातांना व्यायाम देणारे पदार्थ खाल्ल्याने दातांचे आयुष्य वाढते.
५. ब्रशाने आपले दात पूर्णपणे स्वच्छ होत नाहीत. दोन दातांच्या मध्ये असणारे अन्नकण काढण्यासाठी नायलॉनचा एक धागा बाजारात विकत मिळतो. हे धागे दोन प्रकारचे असतात. एक बोटाला गुंडाळून वापरण्यासाठी तर दुसरे छोट्याशा प्लॅस्टिकच्या दांडीला लावलेले (लहान मुलांसाठी व नवशिक्यांसाठी खास उपयुक्त). या प्रकारे दात साफ करण्याच्या पद्धतीला फ्लॉसिंग म्हणतात.

तसेच दात निरोगी राहावेत यासाठी आपण खरेच प्रयत्न करतो का हे ही तपासून पाहिलेत तर छानच.

१. अन्न खाल्ल्यानंतर खळखळून चूळ भरतो का?
२. दररोज सकाळी व रात्री दात घासतो का? - दात घासण्यासाठी सर्वोत्तम कडुलिंब, उंबर, सुबाभूळ, मोगला यांच्या काड्या तसेच विको पेस्ट+पूड (मी विकोचा सेल्समन नाही) ही भारतीय पद्धती आहे हे आपणास ठाऊक आहे का?
३. दररोज रात्री आपण फ्लॉस करता का?
४. आपल्या श्वासाचा गंध आपण तपासून पाहता का? दुर्गंध येत असेल तर तुम्हाला हायजेनिस्ट (वेगळे दंतवैद्य) कडून दातांमधील बॅक्टेरियांचा बंदोबस्त करून घ्यावा लागेल.
५. आपल्या हिरड्यांमधून ब्रश करताना रक्त येते काय? येत असेल तर तुम्हाला हायजेनिस्ट (वेगळे दंतवैद्य) कडून दातांमधील बॅक्टेरियांचा बंदोबस्त नक्कीच करून घ्यावा लागेल. कारण तुमच्या हिरड्या आजारी असण्याची दाट शक्यता आहे. दुर्लक्ष केलेत तर तुमच्या हिरड्यांची दातांवरील पकड हळूहळू सैल होऊन दात पडतील.

मी काही विसरलो असल्यास जाणकारांनी भर घालावी.

वरील मुद्दे आपण मनावर घेतलेत तर सुंदर दंतकथांना मनोगत मुकेल हे मात्र खरे.

टीप- दुर्दैवाने भारतातील सर्वच दंतवैद्य तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन करतीलच असे नव्हे. मी माझ्या तक्रारी घेऊन दोन वेगवेगळ्या दंतवैद्यांकडे गेलो. त्यांनी "या तक्रारी गौण आहेत व तुम्हाला कसल्याही वैद्यकीय उपचारांची गरज नाही" असे सांगून परतवले. नंतर मोठ्या इस्पितळातल्या एका दंतवैद्याला सहज भेटण्याचा योग आला आणि त्याने मला डेंटल हायजेनिस्टला भेटण्याचे सांगितले. खरोखरच डेंटल हायजेनिस्टकडून उपचार करून घेतल्या नंतर आता दोन वर्षे उलटल्यावरही मला श्वास दुर्गंधी वा ब्रश करताना हिरड्यातून येणारे रक्त बंदच आहे.