तात्या आणि एकनाथराव यांना माफी प्रतिसादात गोवण्यास कारणीभूत असल्याने मी येथे लिहित आहे. रोख जर फक्त माझ्यावर असता तर नक्कीच हलकेच सोडून दिले असते यांबाबत निश्चिंत असावे. पण या दोघाही महोदयांनी क्षमा मागण्याचे काहीच कारण नाही असे मनापासून वाटत असतानाही आधी उघडलेले तोंड आता बंद ठेवणे दुट्टप्पीपणाचे ठरते म्हणून हे लिखाण... थोडे अधिकच विस्ताराने लिहिले आहे. पण तो प्रमाद आपले विचार समोर न बोलताच पोहचले असतील ह्या गृहितकापेक्षा येथे कमी धोक्याचा ठरावा.

मिलींदराव, माफीच्या मुद्द्यामुळे विषयांतर झालेले आहेच, आता अर्धवट सोडणे चुकीचे ठरेल असे वाटते आहे. कृपया समजून घ्यावे.

माझ्यामते, महाभारतात कोणत्याही व्यक्तीला काळ्या किंवा पांढऱ्या रंगात बघता येत नाही. ... पटणे अथवा न पटणे हा मुद्दा गौण आहे. 

चर्चेचा विषय हा एक प्रवाह आहे... त्याच्या अनुषंगाने, शैलीनुसार, किंवा जसा रंग भरत जाइल तसे थोडे इकडेतिकडे होणे हे जिवंतपणाचे लक्षण आहे. अगदीच कोणी बहकले तर जाणीव करून द्यावीही... पण तसा आत्ताचा प्रसंगही नव्हता अन् येथे संबंधित असलेल्या कोणाही व्यक्तींचा तसा इतिहासही नाही. पूर्वपुण्याई हे आता नाही ते धंदे करायला परवानगी देत नाही हे ही खरे. माफी-भारतास सुरुवात होण्यापूर्वी विषयांतर मुळीच नव्हते... होते ते फक्त शैल्यांतर!

आपण सर्वच तशी सभ्य मंडळी. अति-नियंत्रित आणि अति-संवेदनाशील अशा लिखाणाच्या आग्रहाने/ अट्टाहासाने खेळीमेळीचा आणि मोकळेपणाचा बळी जाइल. बहुतेकजण अंगीभूत सौजन्यामुळे कोषात जातील, आणि लिहिताना हजारदा विचार करतील. 

माझे हे विचार बहुमान्य आहेत की नाहीत हे माहीत नाही.. त्यामुळे प्रांजळपणे माझ्या वरील बडबडीला छेद जाइल असे करतो..."माझ्या भावना मांडताना काही चुकले असेल... एखादा शब्द कमी अधिक झाला असेल तर मनःपूर्वक माफी मागतो." 

वादे-वादे जायते तत्वबोधः!