विनायकराव - आपला या विषयातील व्यासंग दांडगा आहे. आपले विचार वाचून मराठयांच्या इतिहासाच्या काही अंगांविषयी किती कमी माहिती आहे हे जाणवले. वैषम्यही वाटले. असो... आडपडदा न ठेवता हे ही सांगतो की तुमची मते पटली आहेत असे मात्र मुळीच नाही. वाचनानंतर तुमच्याशी सहमत झालो तर सांगेनच!

बाजीरावाने "झाडाच्या मुळांवर घाव घातला की फांद्या आपोआप खाली येतात" या सूत्राचा पाठपुरावा करीत दिल्लीवर स्वारी केली. शिंदे, होळकर यासारखे सेनानी आणि मराठी महासेना उभी केली. उत्तरेकडे इतक्या दूरवर सेना घेउन जाणे आणि मोहीम काढणे हा paradigm shift बाजीरावाने साकारला. बाजीरावाच्या मोहिमांची तुलना नेपोलियनच्या युद्धकौशल्याशी केली जाते.

दिल्लीच्या बादशहाला घाबरवून त्याच्याकडून चौथाईच्या सनदांवर सह्या घेणे याकडे हिणकसपणे पाहत बाजीरावाच्या पराक्रमांस अक्षता लावणे...बाजीरावाच्या मोहिमेमागे तेवढीच फक्त अपेक्षा होती असा निष्कर्ष काढणे हे "काय भुललासी वरलिया रंगा" सारखा प्रकार आहे.
बाजीरावाचा पराक्रम हे मराठी माणसाने पाहिलेल्या उदात्त स्वप्नाचे अत्युच्च शिखर नाही हे मान्य; मात्र बाजीरावाने टाकलेली पावले हे मोठ्या आकांक्षाचेच प्रतिबिंब आहे.

चौथाई, आणि बादशाहाशी असलेले संबंध यांचा संदर्भ लावून हे दिल्लीपतींचे अंकित होण्याचेच स्वप्न बाळगले असे म्हणणे हे बादरायण संबंधांसारखे होते.

वरील मुद्दे मांडताना माझ्या मनात संदिग्धता नाही.
शेजवलकरांचे काही हीन हेतू असतील असे बिलकूल मनात येत नाही, किंवा विनायकरावांनी त्यांची चुकीची अथवा without context वचने मांडली असेही नाही. त्याचबरोबर बाजीरावाची ज्या किरकोळीत त्यांनी बोलवण केली ते पाहिले की बाकीच्या माहितीबाबतही संदेह वाटू लागतो हेही लपवून ठेवावेसे वाटत नाही.

खाली दिलेल्या विषयांचा अगदीच गंध नाही असेही नाही तरीही माझा तपशीलातून अभ्यास आजमितीस नाही हे ही खरेच. त्यामुळे जाणकारांना विनंती की कृपया आपल्या ज्ञानाचा लाभ मिळावा.
असो... म्हणूनच काही प्रश्न -

पगार देण्यासाठी भाउंनी दिल्लीचे तख्त फोडण्यासारखी गोष्ट केली यांत पैशाची हौस जास्त दिसते की दिल्लीची अधिकच केलेली मानहानी दिसते?
दत्ताजी, महादजी, फडणवीस, ... माधवरावांस वाव(thanks!), हे अपवाद आहेत आणि पेशव्यांनी मात्र फक्त पैशासाठीच सारे खेळ केले?
अटकेपार झेंडे लावण्यामागे पैसा हाच मुख्य हेतू होता की आणखी काही?
पानिपतावरची लढाईमध्ये अनेक आघाड्यांवर, तयारीमध्ये, आराखड्यांबाबत घोडचुका होत्या हे अनेकदा सिद्ध झाले आहे. मात्र ती लढाई पेशव्यांची खाजगी होती की मराठा साम्राज्याची होती की मराठा साम्राज्याच्या नावाखाली काही भटांची होती?
दिल्लीच्या गादीवर वारस बसविण्यामध्ये मराठयांनी कालानुरुप योग्य ते राजकारण केले (बाळाजीच्या काळापासून!) की स्वतःस अंकितच मानण्याच्या मानसिकतेचे ते प्रगटीकरण आहे?
पेशवे-शाहू-बादशहा अशी साखळी जोडण्यात कितपत दम आहे? 
शाहू येथे परतला तो बादशहाचा सुभेदार या नात्याने पण त्याचे नंतरचे वर्तन अंकिताचे होते काय?
बाजीरावाने दरबारात "अटकेपार मराठयांचा झेंडा लावण्याची" आणि "भारतवर्ष पवित्र करण्याची" गर्जना केली तेव्हा शाहू मुघलांचा अंकित म्हणून ऐकत होता की हिंदवी स्वराज्याचा छत्रपती म्हणून?
...

विकिपेडिआ वर काही त्रोटक माहिती मिळाली... अभ्यासक मनोगतींनी काही संदर्भ कळवावेत. म्हणजे अगदीच मूर्खासारखे काही मांडले/विचारले गेले असतील तर सुधारणा करीन. त्यास नेहमीच तयारी!