रात्री अचानक जाग आली. जाग का आली याचा विचार करत होते. मग लक्षात आले ओट्याचा नळ नीट बंद केला नाही. रात्रीच्या शांततेत आवाज किती मोठे वाटतात ना? पाण्याचा टपक..टपक..आवाज..घड्याळाची असहयपणे मोठी वाटणारी टिकटिक..मधेच शीतकपाटाच्या यंत्राची वाढलेली घरघर.(त्यात आपोआप चालू होणार्या रिलेचा 'टक' आवाज..).आणि या सर्वात स्वत:ला जाणवणारे हृद्याचे ठोके..पलंग खिडकीपाशी आहे. आणि कुठून मला बुद्धी झाली कुणास ठाऊक, मी खिडकीकडे पाहिले.
अचानक खिडकीत कडेला मला एक पांढरट हात दिसला.असे वाटत होते कोणीतरी खिडकीच्या शेजारच्या भिंतीवर उभे आहे आणि खिडकीच्या कडेला आधारासाठी हात ठेवला आहे..बापरे..आता काय करु? परवाच मनोगतावर 'हवी आहेत: भूते' म्हणून साद घातली..आणि आज अचानक माझ्या हाकेला कुणीतरी आवाज दिला होता. किंचाळण्यासाठी तोंड उघडले, पण तोंडातून आवाज फुटेना.. भूतांनो, माफ करा मला याबाबतीत मी विनोद केला आणि तुमची खिल्ली उडवली म्हणून. १-२ कि ५? नक्की किती मिनीटे अशी गेली आठवत नाही, पण शेवटी मी धीर करुन खिडकी उघडली. (खिडकीला गज नाहीत ३र्या मजल्यावर असल्याने.थेट उघडता येते आणि पूर्ण एक माणूस पण त्यातून जाऊ शकतो.) बाहेर कोणी नव्हते. धाडस करुन खिडकीबाहेर डोकावून भिंत पण पाहीली..कोणी नव्हते.. परत झोपले. परत कर्र...कर्र आवाज आला..लाकडी फरशीवर कोणी चालले तर येतो तसा..आता मी डोळे गच्च मिटून घेतले..आवाज जवळ जवळ आला.. देवा.हनुमाना..माफ कर मला.. आत्म्यांनो, मला माफ करा..तुमच्या मितीत डोकावून पाहण्याचा प्रत्यक्ष प्रयत्न मी कधी केला नाही..कधी कोणाचे वाईट केले नाही..देवा, वाचव मला..
आणी अचानक माझे पाय कोणीतरी धरले..आता मी डोळे उघडलेच शेवटी.. अंधारात दिसत नव्हते, पण ती एका स्त्रीची आकृती होती. तिने माझे पाय घोट्यांपाशी घट्ट धरले होते..माझा आवाज जणू मुका झाला होता. आता मी फक्त जे घडते ते पहात होते. तिने पाय धरुन मला उचलले आणि खिडकी उघडली.. नाही, आता मला किंचाळायलाच हवे..मी अशी गप्प मरणार नाही.. नाही..मला अजून जगायचे आहे..
आणि................................................................
मी जागी झाले झोपेतून घामेघूम होऊन. हे स्वप्न आहे यावर माझा अजून विश्वास बसत नव्हता. परत खिडकी उघडून पाहिले. आता दिवा लावून घड्याळ पाहिले. १.३० वाजला होता. बापरे..माझीच 'ब्रह्मप्रहराची थिअरी' लावायची झाली तर मला अजून किमान १.३० तास भितीच्या छायेखाली जगायचे होते..शेवटी दिवा घालवून 'वेडे खोके' चालू केले आणि काहीतरी निरर्थक कार्यक्रम बघत बसले. काहीही...'यांत्रिक शेती' पासून ते 'TV टेलीशॉप'...कोणत्यातरी खेकडा वा तत्सम प्राण्याच्या कोशिंबीरीची कृती....ड़ोके रिकामे करायचे होते मला. त्याशिवाय परत झोपेचे वरदान मिळणार नव्हते. अजूनही स्वप्न आणि जागेपणातल्या सीमारेषा फिकट होत्या.अजूनही न्हाणीघराचे दार उघडून कोणीतरी खोलीत येणार आहे ही भावना होती.काय करावे? कपडे बदलून चांगले कपडे घालून झोपावे का? या खोलीत आपण सकाळी मृतावस्थेत सापडलो तर किमान presentable आणि छान दिसू... गायत्रीमंत्र मनातल्या मनात म्हणावा(मनातल्या मनात उच्चार न करता म्हटलेला चालतो ना हो स्त्रियानी गायत्रीमंत्र?) का?...रामरक्षा तर येत नाही..अथर्वशीर्ष म्हणावे..मोठे आहे..वेळ जाईल..आणि अथर्वशीर्षाच्या पहिल्या ७ ओळीनंतर स्मरणशक्तीने धोका दिला..
असेच ४ वाजले..आणि आता मी निश्चिंत झोपले...'४' म्हणजे पहाट.सकाळ..पवित्र काळ..
कालची रात्र तरी धोका टळला होता.. पण मला अजून ४० रात्री अशाच काढायच्या होत्या!!!!!!!!!!!!
आपली(आठवणींनी भयभीत)अनु