मानस आणि जयन्त,
मुद्देसूद प्रतिसादांबद्दल मी आपल्या दोघांची आभारी आहे.
मतला
- पहिल्या ओळीत खरेतर मी 'माझ्यावर' च्या ऐवजी 'अब्रूवर' किंवा
'देहावर' लिहिणार होते.परंतु येथील किंचित सोवळे वातावरण विचारात घेऊन
'माझ्यावर' असे टाकले.उगीच अश्लीलतेवरून पुन्हा वादंग नको -अगस्ती प्रकरण
अजून ताजे आहे. तसेच मागे एका स्त्री-सदस्याच्या ( नाव आठवत नाही)
कवितांवरून बरीच सुंदोपसुंदी झाली होती.तरीही मतला अजून सुधारता येईल का
ते बघते.
जयंत, आपल्या काही प्रश्नांची उत्तरेः
विशेषतः'जोहार' च्या संदर्भात अर्थ स्पष्ट नाही.
जोहार - अग्निदिव्य - जे तिला रोज करावे लागत आहे.
२) दुसरा शेर असा लिहिला तर ?
बोलली उद्विग्न सुमने विखुरलेली
"शेवटी कोणीतरी खुडणार होते"
तुमचे बरोबर आहे, असाच लिहायला हवा होता. अवतरण चिन्हे राहून गेली.
३) वेचते ज्यातून मी थोडा जिव्हाळा
ते सुखाचे रोकडे व्यवहार होते
यात (जिव्हाळा 'ओला' म्हणून) 'कोरडे व्यवहार होते" चालू शकेल.अर्थातच 'रोकडे' मधला जो विशिष्ट अर्थ आहे तोच अभिप्रेत नसल्यास!
'रोकडे' चा तो विशिष्ट अर्थच अभिप्रेत आहे.
४) आज मुजऱ्याचा कसा बेरंग झाला
पाहणारे रोजचे दिलदार होते
यात 'पाहणारे रोजचेच दिलदार होते' हे अधिक योग्य असले तरी मात्रांत बसत नाही म्हणून 'पाहणारे कालचे दिलदार होते' म्हटल्यास 'आज मुजऱ्याचा कसा बेरंग झाला' अधिक सार्थ होते.
हे पटले नाही. पाहणारे रोजचेच, मुजरा सादर करणारी रोजचीच, तरीही आज मुजरा
रंगला नाही असे का?, असे म्हणायचे आहे.मात्रामर्यादेमुळे 'रोजचे' ला'च'
लावता आला नाही हे खरे.
आपली,
मृण्मयी