हृदयस्पंदनदर मुळातच जास्त असू शकतो. मात्र फार नाही. ६०-८० असा सामान्यतः असतो. तसा असेल तर तो आटोक्यात आणण्याची काहीच गरज नाही. डोंबिवलीस एक प्रकाश वेलणकर नावाचे गृहस्थ आहेत. त्यांचा लहानपणापासून ३२ ठोके दर मिनिटास असाच हृदयस्पंदनदर आहे. तो संपूर्णतः नैसर्गिक असल्याचे वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध झालेले आहे. ती संपूर्ण कहाणी त्यांनी '३२ हार्टबीटस्' ह्या त्यांच्या पुस्तकात नमूद करून ठेवलेली आहे. अवश्य वाचा.
प्राणायाम व योगसाधनेमुळे हृदयस्पंदनदर निःसंदिग्धरीत्या कमी होतो. एवढा एकच उपाय आहे का? नाही. उपाय अनेक आहेत. शिथिलीकरण हा एक आहे. मात्र एका विशिष्ट मर्यादेबाहेर हृदयस्पंदनदर कमी होऊन चालत नसावा. कारण त्यामुळे रक्तशुद्धीकरणाचा दर कमी होता उपयोगाचा नसतो. तुमच्या शरीराच्या क्षमतेनुरूप कमीत कमी हृदयस्पंदनदर किती असावा ते ठरत असावे. म्हणूनच प्रकाश वेलणकरांना पहिल्यांदा जेव्हा ३२-हृदयस्पंदनदर असल्याचे लक्षात आले होते तेव्हा तातडीने भरती केलेले होते.
श्वसन संथ केल्यासही उपयोग होतो. सामान्यतः मनुष्य मिनिटाला १४-१५ श्वासोच्छवासाची आवर्तने करतो. ती कमी करत न्यावी. ऋषीमुनी तपश्चर्या करत असता ५-६ श्वासोच्छवासाची आवर्तने मिनिटाला साध्य करत असावेत.