या राजकीय पक्षाबद्दल जानेवारी २००६ मध्ये पहिल्यांदा ऐकले होते. तेंव्हा त्यांचे संकेतस्थळ "http://paritrana.org" असे होते. त्यांनी पूर्वी जाहीर केलेली "आइडॉलॉजी" आणि "स्ट्रटेजी" आज दिलेल्यापेक्षा वेगळी होती. एकूणच संदेश खूप सुटसुटीत आणि सरळ होता. आताचे त्यांचे संकेतस्थळ हे शब्दबंबाळ आहे.
आपल्या माहितीसाठी हा पाहा पूर्वीचा संदेश -
"द ऑब्जेक्टिव ऑफ़ द पार्टी इज टू रीसस्किटेट ऍन्ड रीस्टोअर द ग्रेट ट्रॅडिशन्स ऑफ़ भारतवर्षा'ज ग्लोरिअस गोल्डन एज बेसड ऑन द इटर्नल व्हॅल्यूज ऍन्ड टू ट्रान्स्फॉर्म भारतवर्ष इनटू अ पॉवरफुल नेशन ऍन्ड रीइस्टॅब्लिश भारतवर्ष टू इट्स राइटफुल प्लेस इन द वर्ल्ड ऍज 'जगद्गुरु'."
माझ्या अंदाजाप्रमाणे ही संघाची भाषा वाटते.
आता कोणी भारतीयत्व म्हणजे फक्त संघाची मक्तेदारी आहे का असा हल्ला चढवू नये. तसे मी म्हटलेले नाही... कारण तसा विचारच माझ्या डोक्यात नाही. त्याचवेळी साम्य बाजूस सारता येणे अशक्य आहे... म्हणून परस्परसंबंध (correlation) दाखविण्याचा प्रयत्न आहे... कारण-परिणाम असा रंग देण्याचा बिलकुल नाही.
किंबहुना माझा संघाच्या भाषेबाबतचा अंदाज बरोबर असेल तर एक म्हटले तर मजेशीर म्हटले तर सूचक असा विरोधाभास लक्षात येतो - संघाचे विचार जवळपास तसेच्या तसे "मिशन स्टेटमेंट" म्हणून शिरोधार्ह मानण्यास त्यांनी संकोच केलेला नव्हता. त्याचवेळी जणू जाणीवपूर्वक संघाशी कोठेही संबंधही दाखविलेला नव्हता. आतातर वरील वाक्ये गायबच झालेली आहेत.
उच्चशिक्षणाचा आणि राजकीय बदल घडवून आणण्याचा परस्परसंबंध नसेलही कदाचित... परंतु त्यांना अनेक संकेतस्थळांवर मिळणारा पाठिंबा हा परित्राणवरील विश्वासापेक्षा प्रस्थापित राजकीय व्यवस्थेवरील अविश्वास अधिक प्रगट करतो असे वाटते.
पार्टीचे भवितव्य आणि वाटचाल कशी असेल याचे आराखडे बांधणे तेंव्हाही अवघडच होते. अजूनही नेमका अंदाज येत नाही. आई. आई. टी. वगैरे उच्चशिक्षणाची पार्श्वभूमी लोकपरित्राणाला इतके आकर्षित करून घेत आहे. २१ व्या शतकाकडे किंवा "जनरेशन झी" असे काहीसे जे म्हणतात तेही त्यांच्या संकेतस्थळावर दिसत नाही. सरकारी संकेतस्थळाला भेट दिल्यासारखे वाटले.
आजूबाजूचे जग, राजकारण, जनसंपर्काची माध्यमे आणि पद्धती कशा रितीने बदलत आहेत याची ही चुणुक आहे हे मात्र निश्चित!
असा उपक्रम हाती घेतल्याबद्दल या पाच वीरांचे अभिनंदन! त्यांच्या राजकीय प्रवासास मनःपूर्वक शुभेच्छा!!