श्रीपाद जोशी व निज़ामुद्दीन गोरेकर यांचा उर्दू-मराठी शब्दकोशही  चांगला आहे (सध्या उपलब्ध आहे की नाही ते माहीत नाही).

पण सर्व कोशांत काही अडचणी असतात त्या लक्षात घ्याव्यात.
एक म्हणजे, शब्द देवनागरीत वाचायचे असतील तर ठीक आहे, पण छपाईच्या सोयीसाठी मूळ शब्द उर्दूत न देता अरबीत देण्यात येतो. याचे कारण अरबीत एका ओळीत लिहिता येते तर उर्दूत एकाच वेळी उजवीकडून डावीकडे आणि वरून खाली, अक्षरे एकमेकात गुंतवून लिहिण्याची पद्धत आहे. लिपीत रस नसेल तर याची अडचण होणार नाही, अन्यथा मूळ उर्दू लिपीत वाचलेला शब्द व शब्दकोशातला अरबी लिपीतला तोच शब्द यांची जुळवाजुळव करतांना होणारा त्रास सहन करावा लागेल.
दुसरे, कोणत्या (उर्दू की मराठी) अकारविल्हेप्रमाणे शब्दकोशातले शब्द आहेत ते शिकल्याशिवाय शब्दकोश बघता येत नाही. उर्दूप्रमाणे असल्यास हवे ते अक्षर कोणते आहे ते माहित असावे लागते, उदा. "फ़िज़ा" हा आपल्या नेहमीच्या परिचयातला शब्द पहायचा झाल्यास जोशी-गोरेकरांच्या कोशात "फ़दा" बघावा लागतो (कारण उर्दूतल्या चार "ज़"पैकी इथे येणाऱ्या "ज़्वाद"चा उच्चार ज़ व द यांच्यामध्ये कुठेतरी होतो म्हणून ते त्याला "द"मध्ये मोडतात)."मद्दाह" च्या कोशात ही अडचण बहुधा नसावी.
आणि, सर्वात शेवटचे, शब्दार्थ कळला तरी शे'राचा अर्थ कळेलच असे नाही. पण तो भाग अगदीच वेगळा आहे.

हे सगळे देण्याचे एरवी कारण नव्हते, पण मला मी स्वतः उर्दू शिकत होतो त्या काळाची आठवण आली आणि या सगळ्या भानगडींची पूर्वकल्पना या मार्गावरून येणाऱ्या प्रवाश्याला देणे आवश्यक वाटले.

तरी काळजी करण्याचे तसे काही कारण नाही. कुठलाही कोश घ्या. इथे मनोगतावर किंवा अन्यत्र असलेले अनेक मित्र/तज्ज्ञ तुम्हाला प्रेमाने मार्गदर्शन करतील असा मला विश्वास आहे.

दिगम्भा