या ओळींचा अर्थ काय तो मज पामराला कळला नाही.
मला काय अभिप्रेत आहे ते सांगण्याचा प्रयत्न करतो.
...गूढनिळ्या अबोध जाणीवेमध्ये लडबडल्याने आकार हरवलेले..
अनेक कवी आणि लेखक सतत कुठल्यातरी,('गूढनिळ्या' असे व यांसारखे शब्द वापरून), मानसिक स्तरांबद्दल लिहीत असतात, त्या त्यांना अभिप्रेत अशा जाणीवांमध्ये हरवलेले व स्वतःचा मूळ प्रकट होणारा अर्थ हरवलेले शब्द.
..चिद्घन ऊर्मींतून उमटत आहेत असे भासणारे हुंकार..
आपल्या अबोध जाणीवांमध्ये होणाऱ्या हालचाली यांसाठी, 'चिद्घन ऊर्मी' ' असा शब्द योजला आहे, आणि त्यांचे प्रकटणारे रूप हे शब्द आहेत. पण आपण जे भाषेचे संस्कार झालेले शब्द रोज वापरतो त्यात या ऊर्मींचा ठसा आता किती उरला आहे ? असे वाटते. ज्या ऊर्मींची अभिव्यक्ती म्हणून जे ते शब्द निर्माण झाले; पण काळाच्या ओघात, भाषिक संस्कारांमुळे, बदललेल्या सामाजिक परिमाणांमुळे किती शब्द त्या मूळ ऊर्मींशी प्रामाणिक राहिले आहेत? म्हणून जरी ते त्या मूळ ऊर्मींतून आलेले असले , त्या ऊर्मींचे हुंकार असले, तरी त्यांची नाळ आता तुटली आहे. त्यामुळे ते जुने शब्द आता बदललेल्या परिस्थिती मध्ये मला असे भासवत आहेत की ते, ऊर्मींतून येणारे हुंकारच आहेत. पण मी जाणतो की ते नुसते दोर तुटलेले पतंग आहेत.
..क्षितिजांच्या रेषा कापत तुझी हाक माझ्यापर्यंत येईल...
माझ्या मित्रापासून मी आता शाब्दिक परिमाणांनुसार अनेक योजने अनेक प्रदेश दूर आहे. तो नव्या भाषेच्या प्रांतात आहे तर मी 'मूळ प्राचीन ऊर्मींमध्ये' विहरत आहे. त्याच्या शब्दांना आता कित्येक क्षितिजे ओलांडून यायचे आहे. आणि मलाही (पक्षीरूप असल्याने विसाव्याचे ठिकाण) दिलासा हवा आहे.
हा प्रयत्न गोड मानून घ्यावा,
लोभ असावा ही विनंती,
--आपला नम्र, लिखाळ.