श्री लिखाळ महोदय,
एवढ्या जिव्हाळ्याने तुम्ही मला समजाऊन दिलेत मी आपला आभारी आहे. काल मी चोमस्की चे Language and Resposnibility वाचीत होतो (म्हणजे त्यातले मला काही समजले असा उगाच गैरसमज नको! पण हे गुपित केवळ तुमच्या-माझ्यातच ठेवा! ः) ), आणि लगेच तुमचे 'डुक्करा' वाचायला मिळाले.

तुमच्या स्पष्टीकरणातल्या या ओळी विशेष आवडल्याः

...पण काळाच्या ओघात, भाषिक संस्कारांमुळे, बदललेल्या सामाजिक परिमाणांमुळे किती शब्द त्या मूळ ऊर्मींशी प्रामाणिक राहिले आहेत? म्हणून जरी ते त्या मूळ ऊर्मींतून आलेले असले , त्या ऊर्मींचे हुंकार असले, तरी त्यांची नाळ आता तुटली आहे. ...

कधीकधी मला वाटते, यात बिचाऱ्या शब्दांचा तरी काय दोष. ते तर निव्वळ भारवाही! जेव्हा मुलभूत भावना अनुभवांच्या आघातांनी शब्दरूप झाल्या, त्यावेळच्या चिद्घन उर्मींची अभिव्यक्ती कालौघात लोप पावली असेलही कदाचित, परंतु हे भारवाही शब्द आता ज्या काही संवेदना लपेटून जन्म पावतात, त्या संवेदनांच्या अनुभूतीची जाणिव तरी ऐकणाऱ्यापर्यंत पोचावी. तुमच्या मुक्तकातल्या विहंगाला त्या प्रेमळ हाकेची आस आहे, तुम्ही संवेदनाशील म्हणून तुम्हाला ती समजेल, ऐकूही येईल; पण शब्दांच्या शुद्धाशुद्धतेचे, स्पृश्यास्पृश्यतेचे भांडवल करून कानाचे पडदे जाणीवपूर्वक बंद करून घेणाऱ्या महाभागांसाठी (तसेच महाभागीणींसाठी) हृदय पिळवटून पिळवटून काढलेल्या वेदनेच्या हुंकारांचा काय उपयोग? बिचारे भारवाही शब्द त्या चिद्घन मूळ उर्मींशी प्रामाणिक राहीले नसतीलही, पण या शब्दांच्या पलिकडल्या संवेदना ती हाक ऐकणाऱ्या माणसानेही (तसेच माणसीनीनेही) जागृत ठेवाव्या हे ही तितेकेच खरे!

तुम्ही मस्त लिहीता. तेव्हा अजून असेच येऊ द्या!

कळावे,
आपला नम्र व स्नेहांकित.