प्रिय मिलिंदराव,
काव्य प्रेम, प्रेमभंग अथवा विडंबन ह्यावर आधारित असले पाहिजे असा आमचा आग्रह नाही. सत्य शिव सुंदर ह्या मर्यादेत बसणार्या नवनवीन विषयांवर काव्य निर्माण झाले तर ते स्वागतार्हच आहे.
आपल्याला ह्या काव्यातून काय म्हणायचे आहे?
रात्र अजून संपली नाही, सूर्य असेल सावली नाही म्हणजे काय?
पक्ष्यास पारध्याने कैद केले आहे एवढे समजले पण जटायूची झेप आणि कैद यांचे नाते समजले नाही. (ज्याचे पंख छाटले गेले असतील त्याने उडण्याची आशा बाळगू नये असे म्हणायचे आहे का?) सीतामाईला वाचविण्यासाठी प्राणार्पण करणारा जटायू आणि निव्वळ अहंपणातून, बंधने झुगारून, वार्यावर मोकाट सुटण्याची इच्छा बाळगणारे मानवी मन ह्यांची तुलना होऊ शकत नाही असे वाटते.
नवे दीप. नव्या मशाली. राख पेटली नाही म्हणजे काय? इंधन संपल्यावर ज्वलनशील पदार्थांची राख होते, ती पेटाणार कशी? आणि राखेचे पेटणे ही कविकल्पना मानली तरी त्यातून काय सौंदर्य निर्माण होते?
आपल्या ह्या गज़लेतील बर्याचश्या शेरांस स्वतंत्र कविता म्हणून स्वीकारणे अवघड होत आहे. आणि तांत्रिक बाजू सोडून दिल्या तरी हे काव्य वाचून मनात सुखदुःखाचा कोणताही आनंद निर्माण होत नाहीये.
प्रसाद (सोपेपणा), माधुर्य (गोडवा) आणि ओज (गेयता, प्रवाहीपणा) ह्या तिन्ही आघाड्यांवर आपले हे काव्य कमी पडते आहे असे वाटते.
आम्ही सामान्य वाचक आहोत. आमच्या वरील विश्लेषणात चूक झाली असायची शक्यता आहे. कृपया आपले काव्य आणि त्यामागची भूमिका आपण समजावून सांगितलीत तर बरे होईल.
आपला
(कृपाभिलाषी) प्रवासी