आमच्या अभियांत्रिकीच्या निरोप समारंभाला पहिल्यांदा भुवया कोरणे व 'फेशियल' करण्याचा बेत ठरला आणि पार्लरमधे गेलो. 'कुठलं फेशियल पाहिजे, नॉर्मल, केशर का गोल्ड?' विचारल्यावर मी खिसे चाचपून पाहिले आणि 'नॉर्मल' सांगितले. पलिकडे माझी मैत्रिण अर्ध्या हातांच्या मेणप्रक्रियेच्या(वॅक्सिंग हो!) पैशात पाऊण हात करुन द्या म्हणून घासाघीस करत होती. भुवया फेशियलच्या आधी उडवण्याचे ठरले. भुवया कोरताना हातांनी आपल्याच भुवया वरुन आणि खालून ताणून धराव्या लागतात तो प्रकार जरा कठीण वाटला. कोरणारी कारागिरीण शिकाऊ होती. ती विचार करुन एक एक केस दोऱ्यात धरुन ताणत होती. मी प्रत्येक केसाला चेहरा स्थिर ठेऊन हात पाय हलवत होते. शेवटी भुवया लाल आणि डोळ्यात पाणी ही अवस्था पाहून माझ्या नंतरचा भुवयांसाठीचा नंबर म्हणाला, 'नको मी भुवया नाही कोरुन घेत आता.'
फेशियल नामक प्रकारात छान वाटते. एकदम आपण महाराणी असल्यासारखे. पण ब्लॅकहेड काढणे हा प्रकार फार यातनामय झाला.
सर्व सोपस्कारातून पार पडल्यावर भुवया लाल आणि सुजलेल्या आणि चेहरा फेशियलमुळे तेलकट अशा अवस्थेत स्वारी बाहेर पडली. कार्यक्रम होता आणि २ तासांनी. मग नंतर एक मोलाची शिकवण मिळाली की 'फेशियल आणि भुवया कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी करायचे. म्हणजे दुसऱ्या दिवशी चेहऱ्याला छान झळाळी येते.'
बाकी मॅनी आणी पेडी हे दोन 'बरे होणे(क्युअर)' मात्र अजून करुन नाही पाहिले बुवा.