आदरणीय मिलिंदराव,

आम्हाला आवडेल तेच काव्य सर्वांनी करावे असा आमचा दुराग्रह नाही. कित्येकदा आम्हास न पटणार्‍या गोष्टींचा अंतर्भाव असणार्‍या काव्याला आम्ही दाद देत आलो आहोत. उदा० मूल नसल्याचे दुःख स्त्रीनेच अधिक उगाळावे हे आम्हाला पटत नाही परंतु कवितेतील एखाद्या स्त्रीमनाने तसा भाव व्यक्त केल्यास आम्ही तिच्या भावाचा आदर करतो. इथे सत्य कटू आहे आणि न मिळालेल्या मातृत्वाचतच जणु सौंदर्य दडले आहे असे मानून आम्ही ते स्वीकारतो. पण तिथेच जर एखाद्या स्त्रीमनाने तिला मूल मिळाले नाही म्हणून जग, देव, दैव अथवा इतर कोणत्याही गोष्टीस शिवीगाळ करायला सुरुवात केली तर ती आक्षेपावीच लागेल.

दुसरा महत्त्वाचा मुद्दा सुबोधतेचा आहे. काव्यात बह्यर्थप्रतिपादकता असणे आवश्यक आहे. भाषेचे ज्ञान असलेल्या माणसास वाक्य वाचून काही ना काही अर्थबोध झालाच पाहिजे. मला जे मांडायचे आहे ते मी मांडले, लोकांनी त्यांचे त्यांनी समजून घ्यावे हा (मकबूल्फिदाहुसेनी) बेजबाबदारपणा स्वीकरणीय नाही. काव्य रचल्यावर ते वाचून, अनाकलनीय तर नाही ना हे पाहून, तसे असल्यास कवीने त्यात आवश्यक त्या सुधारणा केल्या पाहिजेत. प्रसाद, माधुर्य, ओज ह्या सर्व निकषांवर काव्य नीट जमेपर्यंत वाट पहावी असे वाटते. मग त्यास काही दिवस, आठवडे, महिने लागले तरी हरकत नाही.

कवी जेवढा ताकदीचा तेवढी त्याच्या काव्याची कडक समीक्षा करण्यात आम्हाला मोकळेपणा वाटतो म्हणून आपल्या काव्यास हे प्रतिसाद. आपण एक उच्च श्रेणीचे कवी आहात. नवोदित कवी आदर्श म्हणून आपल्या काव्याकडे पाहतात. ते असे एखादे न जमलेले काव्य पाहून ह्यापुढेही जाऊन अगम्य, कुचके, उर्मट असे काही लिहू लागतील त्याची भीती वाटते म्हणून हा लेखनप्रपंच.

राग मानू नये, लोभ आहेच त्याची वृद्धी व्हावी ही नम्र विनंती.

आपला
(सुस्पष्ट) प्रवासी