पोलिस महासंचालक : पी. एस. पसरिचा
अरे हो, पण अनंतचतुर्दशीच्या अगोदर विसर्जनमिरवणुकीच्या मार्गांच्या योजनेबद्दल दूरदर्शनवरून अस्खलित मराठीतून माहिती देताना पसरिचासाहेबांना कधी ऐकलं आहेत का? डोळे मिटून ऐकले, तर बोलणारा सद्गृहस्थ सरदारजी आहे, याचा पत्तासुद्धा लागणार नाही! कदाचित तुमच्याआमच्याहूनही चांगले मराठी बोलत असेल हा गृहस्थ! मग अशा माणसाला परप्रांतीयांत का गणायचे? केवळ नावात 'सिंग' आहे म्हणून???
मुंबई आकाशवाणी संचालक : सतीश सोनकर
'सोनकर' आडनावाचा माणूस मराठी नाही, याचे थोडेसे आश्चर्य वाटते. नसेलही कदाचित; माझे अज्ञान असेलही या बाबतीत - पण मग सोनकरसाहेब नेमके कुठले, तेही जाणण्यास उत्सुक आहे.
अवांतर: मग कोकणातून (किंवा उर्वरित महाराष्ट्रातूनही) येऊन मुंबईत स्थायिक झालेल्या मुंबईच्या "मूळ" रहिवाश्यांच्याही कदाचित अगोदर मुंबईत येऊन स्थायिक झालेल्या पारशांबद्दल काय म्हणाल? (टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या वेबसाईटवर प्रकाशित मुंबईबद्दलची सविस्तर माहिती व इतिहास इथे पहा. [या वेबसाईटच्या मांडणीच्या त्रुटीमुळे खूप 'स्क्रोल-डाऊन' केल्याशिवाय कोऱ्या पानाव्यतिरिक्त काहीच दिसत नाही, याची कृपया नोंद घेऊन, वाचताना भरपूर 'स्क्रोल-डाऊन' करणेचे करावे.] मुंबईचे विविध भाग व त्यांचा इतिहासही येथे पहावयास मिळेल. १६९० साली मुंबईचा माझगाव भाग जंजिऱ्याच्या सिद्दीने बळकावला असता त्याच्याविरुद्ध स्थानिक मच्छिमारांची एकजूट करून सिद्द्याला पळवून लावणाऱ्या रुस्तमजी दोराबजी पटेल या पारशी गृहस्थाबद्दल इथे वाचा. गिरणीत काम करायला मुंबईबाहेरून येऊन मुंबईत येऊन स्थायिक झालेल्या मराठीभाषिक लोकांच्याही आधीपासून मुंबईत राहणाऱ्या या लोकांना ते केवळ मराठीभाषिक नाहीत म्हणून 'परप्रांतीय' का म्हणायचे?)
त्याचे काय आहे, इथे अमेरिकेत अधूनमधून राजकीय कारणांसाठी 'इमिग्रंट' लोकांविरुद्ध बोंबाबोंब होतच असते. यात एक मात्र सोयिस्करपणे विसरले जाते, की बोंबाबोंब करणाऱ्यांचे पूर्वजही कधीतरी इथे 'इमिग्रंट' म्हणूनच आले होते. तसेच आहे थोडेसे. मुंबईचे मूळ रहिवासी म्हणजे बहुधा कोळी, झालेच तर 'पाठारे प्रभूं'सारख्या स्थानिक जमाती. (असे ऐकिवात आहे. चूभूद्याघ्या.) कदाचित 'ईस्ट इंडियन'सारख्या स्थानिक (मराठी भाषिक) ख्रिस्ती जमाती. बाकी सगळेच - मराठीभाषिक किंवा अ-मराठीभाषिक - 'इमिग्रंट', अर्थात उपरे! त्यात मुंबईला 'मुंबई'पण इंग्रजाने दिले (म्हणजे परत बाहेरच्यानेच!), आणि मग महाराष्ट्राच्या इतर भागांतून येणाऱ्या लोकांची वस्ती इथे जमू लागली. पण मग यांच्या आधी आलेल्या लोकांपेक्षा हे लोक स्थानिक कसे? आणि जर सगळेच उपरे, तर मग एका उपऱ्याने दुसऱ्या उपऱ्यास 'उपरे' म्हणून हिणवण्यात काय अर्थ आहे?
जाताजाता: अधिक संशोधनाअंती, 'सोनकर' मराठी नसण्याचीच शक्यता अधिक वाटू लागली आहे. नेमके कुठले, यावर तज्ज्ञांनी प्रकाश पाडल्यास बरे होईल.
- टग्या.