उपवास या विषयावर उपवास करणाऱ्यांना "उपवास का, ते का करावेत, ते कोणी सुरू केले, त्याचे फायदे काय, ते आजही लागू होतात का, तुम्ही खऱ्या अर्थाने उपवास करता का?" असे प्रश्न विचारून भांडवून सोडणे हा माझा आवडता छंद आहे. (अर्थात मी एकादशीच्या दिवशी भाजी, पोळी, साबुदाण्याची खिचडी व इतर खाद्यपदार्थ मनसोक्त खातो.) असो. आता विषयाकडे वळूया.

उपासाचे नियम बनवताना 'काहीही खाऊ नका' हे कदाचित लोकांच्या 'पचनी' पडणार नाही हे टगेरावांचे म्हणणे इथपर्यंत पटले. पण त्यावर उपाय म्हणून त्या नियमकर्त्यांनी किंवा "समाज स्वास्थ्य सुधारकांनी" ज्यांना "उपवास" झेपणार नाही अशा (लहान मुले, गरोदर स्त्रिया, वृद्ध, आजारी, वगैरे) लोकांसाठी पचण्यास हलके, शरीरास चांगले, बेचव व मिळण्यास अवघड (जेणे करून सर्रास सगळ्यांना मिळू नये) असे खाद्य सांगितले. यात काही कंदमुळे, झाडपाला वा औषधी वनस्पतींचे रस यांचा समावेश असे. त्यात खवैय्यांनी अक्कल लढवून पुढील पदार्थ रुळवले असावेत असा अंदाज आहे...
चहा/कॉफी - झाडपाला वा रस या गटात
साबुदाणा/साखर/गूळ/तेल/वनस्पती तूप - झाडाच्या रसापासून बनलेले (तसेच हे नवे पदार्थ त्या निषिद्ध यादीतही नव्हते म्हणून यांना विरोधही झाला नसावा).
भगर, राजगिरा - दुर्मिळ व पचण्यास हलके
बटाटे, रताळे - कंदमुळे (कांदा, लसूण व आद्रक यांच्या शास्त्रोक्त वापराबद्दल एक लेख वाचलेला आठवतो. त्या लेखानुसार... कांदा पदार्थांची चव वाढवणारा तसेच कामवृत्ती वृद्धी देणारा असल्यामुळे त्याला उपवासात बंदी होती. तर खवैय्यांनी लसूण शोधला, त्यालाही निषिद्ध यादीत टाकल्यावर, आद्रक (आले) शोधून काढले पण कालांतराने आल्याची सुद्धा गच्छंती झाली. याचा अर्थ ती यादी बराच काळ अद्ययावत केली जात होती)
यात मला पडलेला प्रश्न हा आहे की दूध, दही, तूप हे या यादीत कधी, का व कसे आले.