वात्रट महाशय ,

खरे तर "शामची आई " संदर्भात मी उपस्थित केलेले मुद्दे मनोगतींच्या भावना दुखविणारे असल्याचे चित्र निर्माण झाल्यामुळे  कोणत्याही वादात सध्या प्रतिसाद द्यायला नको, असे मी ठरविले होते. पण आपले प्रश्न पाहून आता बोललेच पाहिजे असे वाटले म्हणून लिहितो आहे.   

आपण गजानन महाराजांच्या जीवनाची चौकशी करीत आहा. ही माहिती इतकी दूर्मीळ नाही की ती मिळविण्यासाठी मूळ विषयाला चुकीचा फाटा फुटावा. ही माहिती गजानन विजयसाऱखे काव्यस्वरुपी चरित्रग्रंथ, एखादा चरित्रकोश ,किंवा अगदी मराठी विश्वकोशासारखे संदर्भग्रंथ पाहिले तर सहज मिळू शकते. असा प्रश्न विचारणे म्हणजे केवळ दिशाभूल आहे.  

प्रत्येक संत वा भक्त स्वतःचे वेगळे तत्त्वज्ञान सांगतो असे मानायचे कारण नाही. अनेकदा विस्मृतीत गेलेले तत्त्वज्ञानही ते परत जगासमोर ठेवत असतात ( उदा. गोंदवलेकर महाराजांचे वेगळे तत्त्वज्ञान नाही. तर समर्थ ऱामदासांचेच विचार ते पुन्हा आठवून देतात.) फार तर या दृष्टिकोनातून गजानन महाराजांचा अभ्यास  करता येईल.

आपला तिसरा प्रश्न चीड आणणारा आहे .त्यांच्या अर्धनग्न अवस्थेचे स्पष्टीकरण मागणे म्हणजे गांधीजी फक्त पंचाच का नेसत होते असे विचारण्यासाऱखे आहे.केवळ गजानन महाराजच नव्हे तर ज्ञानेश्वर, त्यांचे दोन्ही बंधू,समर्थ रामदास ,अक्कलकोटचे  स्वामीसमर्थ यांचे फोटोही बऱ्याचदा कमरेच्या वरील भागात वस्त्र नाही अशा स्वरूपात पाहायला मिळतात.रामदासांचा माझ्या संग्रहातील फोटो तर केवळ लंगोटी नेसलेला अशा प्रकारचा आहे. या सर्वांना त्याचे स्पष्टीकरण आम्ही मागायचे का? आधुनिक काळात तर  एका भारतीय प्राध्यापकाने  संत बनून गाड्यांमधून अमेरिकेत प्रवास केला.तेथे आश्रमही स्थापला. पण तेथून हाकलले म्हणून पुण्यात येऊन आश्रम स्थापला. त्या आश्रमात नागडे चाळे केले नि त्याचेही तत्त्वज्ञान करून त्यावर पुस्तके छापून घेतली. सतराशे साठ वेळा स्वतःची नावे (कधी भगवान तर कधी ओशो )बदलली . हे उद्योग तर गजानन महाराजांनी केले नाहीत .

संतांच्या हाती चिलीम योग्य वाटत नाही या भावनेशी सहमत होता येईल. पण अशी भावना आधी व्यक्त करा. मगच त्यावर चर्चा करता येईल.केवळ गरळ ओकण्याची प्रवृत्ती दाखविण्यात काहीच अर्थ नाही.

आपण नरेंद्र महाराज व गजानन महाराज यांच्यातील फरक विचारला आहे.हा प्रश्न खास उत्तर देण्यासारखा आहे. गजानन महाराज केवळ लोकमान्य टिळकांच्या सभेस उपस्थित राहिले, ब्रिटिशांच्या नव्हे. तर नरेंद्र महाराजांनी उद्धव ठाकरेंना,त्यांच्या उमेदवाराला आशीर्वाद दिला, तसाच तो नारायण राणेंनाही दिला .म्हणजे सत्ता कोठेही असू दे. सत्ताधारी आपला शिष्य असला पाहिजे, ही एकाच वेळी दोन दगडांवर उभे राहण्याची वृत्ती गजानन महाराजांनी दाखवली नाही हाच त्या दोघांतील फरक आहे.

सर्वसाक्षींनी न केलेले सखोल विवेचनासह  स्पष्टीकरण आपणापर्यंत पोचले असेल अशी आशा आहे.

अवधूत.