कथा छान आहे, पण ...

जर त्या दोघांचा एकमेकांवर प्रेम होतं तर,

कितीही प्रेम असलं दोन जीवांचं एकमेकावर तरी ते लग्न करण्याचा निर्णय घेतात, कशासाठी, सुखी होण्यासाठीच ना, म्हणजे हा एक प्रकारचा स्वार्थच.

ही ओळच गैरलागू होते. प्रेम, त्यातून आलेला सहवास, एकमेकांबद्दलची ओढ, आणि त्यातून घेतला गेलेला लग्नाचा निर्णय, ह्यात स्वार्थ अजिबात नाही. उलट काही कारण न सांगता मुलाच्या घरच्यांनी केलेला विरोध, समजण्या पलीकडे आहे. आणि तो मुलाने मान्य करणेही अजिबात न पटण्यासारखा आहे. एखाद्या व्यक्तीबरोबर आपल्या मुलास/मुलीस आयुष्य काढायचे आहे, अशावेळी, त्यांची पसंती सर्वात महत्वाची, आणि त्यांच्या निवडीला प्राधान्य देण्याची वृत्ती ज्या पालकांमध्ये नाही, त्यांच्यासाठी, इतका त्याग करायची काही गरज नव्हती, तेही नकाराचे कारण नक्की काय आहे ते समजल्याशिवाय. पालकांनी मोठेपणा दाखवायला हवा होता. मुलांच्या आयुष्यभराच्या सुख-आनंदावर असे हिरावून घ्यायचा पालकांना काहीही अधिकार नाही. आणि, अश्या पालकांसाठी केलेला त्यागाला काहीही अर्थ नाही.

त्यातून पळून जाऊन लग्न करणे म्हणजे, पालकांना "टाकून देणे" असा त्याचा अर्थ होत नाही. शेवटी ती ही आपलीच असतात, काळानुसार, ते ही आपल्या भूमिका बदलतातच आणि मनातील सर्व राग-लोभ जाऊन हळूहळू सर्व एकत्रही येतात.

माझ्यामते, आपल्या कथेतील नायक-नायिकेने, पालकांसमोर उगाचच हात टेकलेत.

पळून जाणे ः एकाच शहरात, पालकांना माहिती देऊन, त्यांच्या पसंतीशिवाय, कोर्टात जाऊन लग्न करणे म्हणजे "पळून जाऊन" लग्न करणे काय ?

कुल, आपली कथा सत्यकथेवर आधारीत आहे, त्यामुळे काही गोष्टी जाहीर न करण्याची आपल्यावर असलेली मर्यादा मी समजू शकतो, पण नेमकं त्याच मुळे, कथा एकतर्फी होतेय आणि मुलांनी केलेला "त्याग" अनाठायी असल्यासारखा वाटतो आहे.  घरच्यांच्या पसंतीशिवाय लग्न केलेली बरीच मंडळी माझ्या परिचयाची आहेत, आज लग्ननानंतर काही वर्षांनी न कोणाला कसला पश्चात्ताप आहे, ना कोणी-कोणाला सोडले आहे. बहुतेक मंडळी अगदी सुखात आहेत ( नेहमीच्या 'सांसारिक कटकटी'  सोडून). आधी लग्नाला विरोध करणारे पालकच आज छान आपल्या नातवंडांचे लाड करता आहेत.

माझ्यामते प्रेमात असे अडथळे येतातच, पालक हा सर्वात मोठा अडथळा असतो. पण तो ओलांडूनच पुढे जायचे असते. मोठी झालीत की पिले घरटी सोडून जातातच, त्यात काही ही अनैसर्गिक अथवा चुकीचे नाही, आणि स्वार्थ तर अजिबातच नाही. कारण तसे पाहिले तर स्वार्थ कुठे नसतो ? आई वडीलांना घरी एकटे "टाकून" करियर / नोकरीनिमित्त, शहरे बदलणे सुध्दा स्वार्थच नाही का ? आणि त्यागातही स्वर्थ असतोच.

माझ्यामते, समजुतदारपणा पालकांनीच दाखवायला हवा. मुलांनी नाही. आयुष्यभर मन मारून जगण्यापेक्षा एकदाच "रिस्क" घ्यायला काही हरकत नसावी.

मयुरेश वैद्य.