सर्वसाक्षी महोदय, क्षमस्व, पण या यादीत गाडगेबाबांचे नाव खटकले. आपलं सगळं आयुष्य गोरगरीबांसाठी वेचणाऱ्या, हातात सतत झाडू घेऊन गावे साफ करणाऱ्या, मिळेल त्या घरात जमीनीवर झोपणाऱ्या, फुटक्या मडक्याच्या तुकड्यात मागून आणलेलं शिळं अन्न खाणाऱ्या गाडगेबाबांनी कधी कोणता मानमरतब स्वीकारला नाही की कसल्याही ऐहिक सुखाची आस धरली नाही. एवढंच काय त्यांनी कधी कुणाच्या पायाही पडून घेतलं नाही. दारू पिऊ नका, मांस खाऊ नका, वाईट वागू नका असा उपदेश आपल्या कीर्तनांमधून देणाऱ्या बाबांनी  कधी मोठी भाषणं ठोकली नाहीत की आपण जगज्ञान सांगितल्याचा आव आणला नाही. त्यांनी मरेपर्यंत फक्त जनतेची सेवा, सेवा नि सेवाच केली. गोरगरीबांसाठी, समाजासाठी आपलं आयुष्य वेचण्याचा बाबांचा ध्यास एवढ्या एकाच उदाहरणाने स्पष्ट होईल - जेव्हा आपल्या मुलाच्या मृत्यूची खबर त्यांना सांगितली गेली, तेंव्हा बाबा एवढेच म्हणाले 'असे मेले कोट्यानुकोटी - शोक करू कुणाकुणासाठी !'

तथाकथित चमत्कार करणाऱ्या महाराजांपेक्षा,कुठलेही अवडंबर न माजवता गोरगरीबाची सेवा करणारे,त्यांना रोजच्या जीवनात उपयोगी पडेल असाच उपदेश करणारे, प्रत्यक्ष काम करणारे गाडगेबाबा मला अधिक श्रेष्ठ वाटतात. लोकांना उपदेश करून कुणीही महाराज म्हणून ओळखला जाऊ शकतो, अंग मोडून काम करून जनतेची सेवा करताना मरण पत्करणारा एखादाच.

असो. आणि महाराज शब्दाला आज आलेला अर्थ पाहता त्यांना या नावाने न संबोधनेच उत्तम होईल असे मला प्रामाणिकपणे वाटते !

एक_वात्रट