प्रश्न अवघड आहे, पण माझ्या अल्पमतीप्रमाणे प्रयत्न करून पाहतोः
समाजवादः
समाजवादाचा मूळ हेतू हे सामाजिक समता आणि संपत्तीचे समतोल विभाजन हे आहेत. आणि हे हेतू साध्य करण्यासाठी उत्पादनाच्या साधनांची एकत्रित मालकी हे साधन आहे.एकूणच समाजवाद हा शब्द वरील सीमांमध्ये वेगवेगळ्या तऱ्हेने (हे नीट कसे लिहायचं हो?) वापरला गेला आहे. महाराष्ट्रातल्या एका हुशार राजकारण्याने म्हटलंय की "समाजवाद ही टोपी इतक्या लोकांनी घातली आहे की तिचा मूळ आकार काय हे कोणालाच माहीत नाही."
साम्यवादः
साम्यवाद हा समाजवादाचाच एक पोट विभाग आहे. वरील हेतू आणि साधनांखेरीज साम्यवादाला सरकारविहीन राज्यसंस्था आणि वर्गविहीन समाजसुद्धा अपेक्षीत आहेत.
मार्क्सवादः
मार्क्सवाद हा पुन्हा साम्यवादाचा आणखी एक पोटप्रकार. कार्ल मार्क्सने सांगितलेल्या पद्धतीने आणलेल्या व चालवलेल्या साम्यवादाला मार्क्सवाद म्हणता येईल.मार्क्सने त्याच्या भांडवल या ग्रंथात एक अर्थशास्त्रीय मीमांसा केली आहे व वर्गरहीत समाज कसा स्थापन करावा हे "साम्यवादी जाहीरनामा" या पुस्तकात सांगितले आहे. क्रांतीशिवाय असा समाज बनणे शक्य नाही असेही बहुतेक मार्क्सवाद्यांचे व साम्यवाद्यांचेही मत पूर्वी होते.
ही विविध वाचनातून झालेली माझी मते आहेत. पण विविध लोकांनी खूप वेगवेगळ्या (व सोयिस्कर) पद्धतीने या सर्व शब्दांचे अर्थ लावले आहेत.
आपला (राजकारणी) इहलोकी.