शेवट थोडा अधुरा वाटला, पण कथा वास्तवातली असल्याने तसे झाले असावे.
-- बव्हंशी सहमत आहे. पण उर्वरीत आयुष्याचं हे स्वगत, कोणत्याही संहितेशिवाय म्हणून, त्यावर टाळ्या घेतल्याखेरीज त्याला सध्याचा मेक-अप उतरवता येणार नाही यातला 'संहिते'वरचा अर्थश्लेष ध्यानात घेता, अक्षयला म्हणायचे स्वगत हे मूळ स्वप्नसंहितेतील नसून उत्स्फ़ूर्त संवाद (ऍडिशन्स!) प्रकारातले असेल आणि तो ते टाळ्या मिळतील अशाप्रकारे म्हणेल, हा (आशावादी) शेवट असावा, असे वाटते. कवितेच्या मैफ़लीत पुनरागमनासाठी त्याला शुभेच्छा ;)
अवांतर- ऍडिशन्स घेण्यावरून आठवले. बिल्डिंगमधील गणपतीच्या नाटकावेळी 'घालीन लोटांगण' हे नाटक करताना माझा मित्र कथानायकाच्या भूमिकेत होता. त्यावेळी पोस्टमनचे काम करणाऱ्या नटाने त्याच्या हाती त्याच्या वडिलांचे पत्र देतानाचा प्रसंग साकारताना अगदी आयत्या वेळी (आधी कधीही तालमीच्या वेळी न म्हणता किंवा कधीच कोणतीही पूर्वकल्पना न देता) "तुम्ही त्यांचे कोण?" असे विचारले. बावरलेल्या माझ्या मित्राने "मी त्यांचा मुलगा" असे म्हटल्यावर या महाशयांनी त्यावर कळस करून "कशावरून?!" असा प्रश्न विचारला. त त प प अवस्थेतल्या आमच्या कथानायकाने "आईऽऽ सांग ना यांना"एव्हढेच म्हटले आणि सभागृहात एकच हशा उसळला. तात्पर्य काय, तर मूळ संहितेबरहुकूम सगळ्याच गोष्टी घडतील असे नाही. उत्फ़ूर्तता जोडीस असली तर मूळ संहितेतील दोष/उणिवा झाकले/झाकल्या ज़ाणे अगर मूळ संहितेचे मूल्यवर्धन होणे या दोन्ही गोष्टी शक्य होऊ शकतात. अक्षयकडून हीच उत्स्फ़ूर्तता अपेक्षित!