प्रतिसादलेखकांनी विचारलेल्या कविता:

गतकाळाची होळी झाली मधील मला आठवणार्‍या ओळी:

शेषफणेवर पृथ्वी डोले मेरूवरती सूर्य फिरे

स्वर्गामध्ये इंद्र नांदतो, चंद्र राहूच्या मुखी शिरे

काय अहाहा बालकथा ह्या एकावरती एक कडी

पुराण तुमचे तुमच्यापाशी ये उदयाला नवी पिढी

अशाच अर्थाची 'नवा शिपाई' नावाची कविता आठवते का?

नव्या मनूतिल नव्या दमाचा शूर शिपाई आहे

कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे ।

ब्राह्मण नाही हिंदूही नाही न मी एक पंथाचा

तेच पतित की जे आखडती प्रदेश साकल्याचा ।

-----

सावलीत गोजिरी मुले उन्हात दिसती गोड फुले

बघता मन हर्षून डुले बघता मन हर्षून डुले

नी माझी मी त्यांचा एकच ओघ आम्हातून वाहे ।

बाकीची कविता कुणास आठवत असल्यास सांगा.

पद्मा गोळेंची आकाशवेडी (प्रवासीबुवा, आडनावातील दुरुस्तीबद्दल धन्यवाद)-

मी एक पक्षीण आकाशवेडी दुजाचे मला भान नाही मुळी

डोळ्यांत माझ्या असे एक आकाश, श्वासात आकाश प्राणतळी ।

स्वप्नात माझ्या उषा तेवते अन् निशा गात हाकारिते तेथुनी

क्षणार्धि सुटे पाय नीडातूनी अन् विजा खेळती मत्त पखांतूनी ।

अशी झेप घ्यावी, असे सूर गावे, घुसावे ढगामाजि बाणापरी

ढगांचे अबोली भुरे केशरी रंग माखून घ्यावेत पंखांवरी ।

गुजे आरुणी जाणुनी त्या उषेशी जुळे का पहावा स्वराशी स्वर

बघावी झणत्कारिते काय वीणा, शिवस्पर्श होताच तो सुंदर ।

किती उंच जाईन पोचेन किंवा संपेल हे आयु अर्ध्यावरी

आकाशयात्रीस ना खेद त्याचा निळी जाहली ती सबाह्यांतरी ॥

बालकवींच्या मला आठवणार्‍या २ कविता:

निर्झरास--

गिरिशिखरे वनमालाही दरी दरी घुमवित येई

कड्यावरून घेऊन उड्या खेळ लतावलयी फुगड्या

घे लोळण खडकावरती फिर गरगर अंगाभवती

जा हळुहळू वळसे घेत लपत छपत हिरवाळीत

पाचूंची हिरवी राने झुलव गडे झुळझुळ गाणे

वसंत मंडप वनराई आंब्याची पुढती येई

श्रमलासि खेळूनि खेळ नीज सुखे क्षणभर बाळ

ही पुढची पिवळी शेते सळसळती गाती गीते

झोप कोठुनि तुला तरी हास लाडक्या नाच करी

बाळ झरा तू बालगुणी बाल्यचि रे भरसि भुवनी

आकाशामधुनी जाती मेघांच्या सुंदर पंक्ती

इंद्रधनुची कमान ती, ती संध्या खुलते वरती

रम्य तारका लुकलुकती निलारूण फलकावरती

शुभ्र चंद्रिका नाच करी स्वर्गधरेवर एक परी

ही दिव्ये येती तुजला रात्रंदिन भेटायाला

वेधुनि त्यांच्या तेजाने, विसरुनिया अवघी भाने

धुंद ह्र्‍दय तव परोपरि मग उसळी लहरी लहरी

त्या लहरींमधुनी जाती दिव्य तुझ्या संगीततती

नवल न त्या प्राशायाला, स्वर्गही जर भूवर आला

गंधर्वा तव गायन रे वेड लावि ना कुणा बरे ॥ 

आनंदी पक्षी-

केव्हा मारुनि उंच भरारी नभात जातो हा दूरवरी

आनंदाची सृष्टी सारी आनंदे भरली ॥

आनंदाचे फिरती वारे आनंदाने चित्त अवसरे

आनंदे खेळतो कसा रे आनंदी पक्षी ॥

हिरवे हिरवे रान विलसते वृक्षलतांची दाटी जेथे

प्रीति शांती जिथे खेळते, हा वसतो तेथे ॥

सुंदर पुष्पे जिथे विकसली सरोवरी मधुकमले फुलली

करीत तेथे सुंदर केलि बागडतो छंदे ॥ (केलि चा अर्थ क्रीडा आहे)

हासवितो लतिकाकुंजांना प्रेमे काढी सुंदर ताना

आनंदाच्या गाऊन गाना आनंदे रमतो ॥

जीवित सारे आनंदाचे प्रेमरसाने भरले त्याचे

म्हणोनिया तो रानी नाचे, प्रेमाच्या छंदे ॥

बा आनंदी पक्षा देई प्रसाद अपुला मजला काही

जेणे मन हे गुंगून जाई प्रेमाच्या डोही ॥

उंच भरार्‍या मारित जाणे रूप तुझे ते गोजिरवाणे

गुंगून जाईल चित्त जयाने, दे दे ते गाणे ॥

कुसुमाग्रजांची सागर ही कविता-

आवडतो मज अफाट सागर अथांग पाणी निळे

निळ्याजांभळ्या जळात केशर सायंकाळी मिळे ।

फेसफुलांचे सफेद शिंपित वाटेवरती सडे

हजार लाटा नाचत येती गात किनार्‍याकडे ।

मऊ मऊ रेतीत कधी मी खेळ खेळतो किती

दंगल दर्यावर करणार्‍या वार्‍याच्या संगती ।

तुफान केव्हा भांडत येते सागर ही गर्जतो

त्यावेळी मी चतुरपणाने दूर जरा राहतो ।

खडकावरुनि कधी पाहतो मावळणारा रवि

ढगाढगाला फुटते तेव्हा सोनेरी पालवि ।

प्रकाशदाता जातो जेव्हा जळाखालच्या घरी

नकळत माझे हात जुळोनि येती छातीवरी ॥

अजून काही कविता आठवल्या तर लिहीन. भरभरून प्रतिसादांबद्दल सर्वांचे मन:पूर्वक आभार.

-वरदा