तुम्ही असे ठामपणे म्हणू शकता का की तुम्हाला मिळालेली उत्तरे अगदी १००% खरी आहेत ?

अर्थातच नाही. परंतु या शंकांची वजाबाकी करूनही पुरेशी विविधता शिल्लक आहेच की.

जात/वंश/धर्म याबाबत बरेच जण सार्वजनिक रित्या कुठलेही मत व्यक्त करताना थोडीशी सावध भूमिका घेतात.

बरोबर आहे. पण ते या चर्चेतील व्यक्तींबद्दलही खरं असेल, नाही का?

शिवाय माझे असे मत आहे 'कुठल्याच' गोष्टीचा अभिमान नसणारे लोक कदाचित 'आयडेंटिटी क्रायसिस' मधून जात असावेत किंवा खालीलप्रमाणे असावे.

सगळ्या रकान्यांत "नाही" असे भरणारे ते दोन्ही अमेरिकन व्यक्तिशः अतिशय स्वाभिमानी आणि स्पष्टवक्ते आहेत. त्या दोघांच्या बाबतीत तुम्ही म्हणता तशी शक्यता फार कमी वाटते मला.

माझा दुसरा प्रश्न असा की बरेच लोक धर्म बदलून घेतात. किंवा मातृभाषा सोडून दुसरी भाषा वापरतात. आणि त्यांच्यासाठी 'पर' धर्म/भाषा /देश 'स्व' धर्म/भाषा/देश असतात. त्यामुळे अशा लोकांना जरी जन्माधिष्ठित धर्माचा/भाषेचा/देशाचा/जातीचा अभिमान नसला तरी दुसऱ्या धर्माचा/भाषेचा/देशाचा/जातीचा अभिमान असू शकतो. त्यामुळे वरील उत्तरे दिशाभूल करणारी आहेत असे वाटते.

तुम्ही म्हणता त्यात तथ्य आहे. म्हणूनच मला अभिमान हा परिस्थितीनुरूप "घडतो" असं वाटतं.

या दोघा अमेरिकनांबाबत मात्र तसं काही नाही. ते जन्माने ख्रिस्ती असले, तरी आता कुठलाही धर्म "प्रॅक्टीस" करत नाहीत. त्यांना इंग्रजी सोडून दुसरी कुठलीही भाषा येत नाही, आणि देशात इंग्रजीला दुसऱ्या कुठल्या भाषेचं आव्हान नसल्याने तिचा अभिमान बाळगावा लागत नाही. याउलट अमेरिकेतील स्पॅनिश भाषिकांना मात्र अभिमान बाळगावाच नाही, तर परजावाही लागतो.

दोन्ही अमेरिकनांनी देशाबद्दल "नाही" म्हणावं, याचं मात्र मलाही आश्चर्य वाटलं.

- कोंबडी