महेश नमस्कार,
'अवकाशवेध' तयार करण्यात, वाढविण्यात आणि सुरक्षित राखण्यात काय काय आणि कितपत गंभीर समस्या येऊ शकतात हे तुमच्यापेक्षा जास्त चांगले कुणाला कळेल? ते सर्व लक्षात घेऊन पिळणकरांचे तुम्ही केलेले कौतुक हा त्यांना लाभलेला उत्तम पुरस्कार आहे. त्याखातर पिळणकरांचे हार्दिक अभिनंदन.
अशा प्रयत्नांचे जाहीर कौतुक करण्याने त्यामागच्या प्रयत्नांचे सार्थक होते. मराठीत संकेतस्थळ उभारण्याच्या त्यांच्या निदिध्यासास उमेद मिळते. मराठी जनसामान्यांना महाजालावर अनिर्बंध वावरासाठी हक्काचे स्थान मिळते.
हे सर्व साधण्याकरता तुमचेही मनःपूर्वक अभिनंदन. तुम्हाला स्वयंस्वीकृत सुगं कार्यात मदत आणि प्रोत्साहनाचे अमृत सदैव सादर ठेवणाऱ्या सौ. अल्पना वेलणकर तसेच चिरंजीव सलील वेलणकर ह्यांचेही मनःपूर्वक अभिनंदन.
इथे मला एका संस्कृत श्लोकाची आठवण येतेः
तस्यैवाभ्युदयो भूयाद भानोर्यस्योदये सति ।
विकासभाजो जायन्ते गुणीनः कमलाकराः ॥
म्हणजे,
ज्याच्या उदयनाने गुणवंत अशी कमळे उमलून येतात
त्या सूर्याचा अभ्युदय होवो!
मनोगतासारखे संकेतस्थळ निर्माण करून, ते निरंतर अभंग राखून, निष्पक्ष राखून आणि मराठीच्या उन्नतीसाठी बांधील राखून तुम्ही असंख्य गुणवंत मनोगतींचा विकास साधत आहात, मराठीचा विकास साधत आहात, एवंगुणविशिष्ट तुमचाच अभ्युदय होवो अशी मी प्रार्थना करत आहे.