अभिमान या शब्दाचा कोशातील अर्थ गर्व,ताठा,दिमाख,आपलेपणाची भावना म्हणजेच आपुलकी असा आहे अभिमानाची सुरवात अर्थात स्वतःपासून होते.आणि ते स्वाभाविकही आहे.आम्हाला कशाचाही अभिमान नाही म्हणणाऱ्याच्या कोणत्याही गोष्टीला अथवा कृतीला नावे ठेवली की लगेच राग येतो,असा ज्याना येत नसेल त्यांच्या एका गालावर थोबाडीत मारल्यावर ते आपला दुसरा गाल येशु ख्रिस्तानी सांगितल्याप्रमाणे  पुढे करत असतील तर त्याना माझे त्रिवार वंदन! म्हणजे अभिमानाच्या वर्तुळाचा केंद्रबिंदू असतो मी स्वतः (सelf). त्याच्या  बाहेरील वर्तुळ असते माझे,त्यात माझे कुटुब,आप्त,त्याचेबाहेरील वर्तुळात माझे मित्र(त्यातही माझ्या जातीचे असल्यास जरा अधिक आतले वर्तुळ), त्याबाहेरील वर्तुळ असते माझ्या धर्माच्या लोकांचे.त्यानंतर माझ्या गावाचे,माझ्या प्रातांचे ,माझी भाषा बोलणारे,माझ्या देशाचे,असा वर्तुळाचा विस्तार वाढत जे `आता विश्वात्मके देवे`किंवा जय विश्व म्हणू लागतात त्याना खऱ्या अर्थाने कसलाही वृथा अभिमान नसतो  असे म्हणता येईल.पं नेहरूनी एका ठिकाणी म्हटले आहे For the family should sacrifice the individual,for the community should sacrifice the family,for the country should sacrifice the community बाकी मला कशाचाही अभिमान नाही म्हणणारे या वर्तुळाच्या केंद्रबिंदूपाशीच घुटमळत असतात.कोणाचाच अभिमान नसल्यावर कोणासाठी स्वार्थत्याग करण्याचा प्रश्नच कोठे उद्भवतो?ख़रोखरच भगतसिंग,राजगुरु,वासुदेव बळवन्त ,म.ग़ांधी,लो.टिळक,सुभाष चंद्र,आणि आणखीही कित्येक जण किती मूर्ख होते की `मला कशाचाही अभिमान नाही या सुन्दर तत्वज्ञानाचा आधार न घेता त्यानी आपले संपूर्ण जीवन देशासाठी अर्पण केले आणि तेही असे म्हणणाऱ्यांसाठी की या देशाचा आम्हाला अभिमान नाही.