सदर प्राणी प्रत्येक गाणे नाकातून गातो. बऱ्याच गाण्याची सुरुवात 'ऊं ऽऽऽऽ' ने करतो.  आम्ही घरी म्हणतो ,'बिचाऱ्याला इतकी गाणी सतत नाकातून गाऊन नाकात एखादा फोडबिड येईल.' त्याच्या माईक धरण्याची नक्कल करुन मनसोक्त हसणे हा दूरचित्रवाणीवरील हिमेश कार्यक्रम बघताना आमचा उपधंदा असतो. पण काही गाणी त्यातल्या संगीतामुळे आणि ठेक्यामुळे ऐकावीशी वाटतात, हेही तितकेच खरे. त्याचे गाणे अर्थहीन, अशास्त्रीय वगैरे असेल, पण आनंदी मूडमधे कानाला बरे वाटते. तलन, किशोर,रहमान यांचीही गाणी ऐकतो आणि हिमेशचं झूम झूम,नाम है तेरा तेरा,झलक दिखला जा,हमको दिवाना कर गये,तेरा तेरा सुरुर हीसुद्धा. जुनं असो वा नवं, त्या त्या मूडला कानाला भावतं ते सर्व काही आवडतं. हिमेशच्या संगीतात ड्रम,बॅगपाईप,व्हायोलिन यांचा कल्पकतेने वापर केलेला असतो. काहीतरी नविन आणि वेगळे आहे हे निश्चित. हिमेश बूम जास्त टिकला नाही,रहमान,किशोर,तलत आदी दिग्गजांच्या संगीतापुढे त्याची गाणी टिकली नाहीत हे खरं असलं तरी सध्या त्याची गाणी ऐकायला आवडतात.