मृदुला -

अभिमान नाही हा आपला पहिला प्रतिसादही वाचला. आपली भूमिका वरवर पटली नाही तरी त्या भूमिकेमागील सूत्र हे विचार करण्यास भाग पाडणारे असे होते. आता हा दुसरा प्रतिसाद वाचला. काही गोष्टी समूळ खटकल्या... त्या येथे मांडत आहे.

अभिमान म्हणजे
'आमचा देश कसला भारी आहे, माहितेय.., सगळ्या रंगाची माणसं, सगळ्या प्रकारचा भूगोल (इ इ), नाहीतर तुमचं हे बेट!'
'आमची मराठी भाषा कसली पावरबाज आहे, माहितेय.., कसल्याही प्रकारचे आवाज लिहिता येतात, वाक्प्रचार-म्हणी वगैरे तर काय बघायलाच नको! नाहीतर तुमची भाषा एकाच स्पेलिंगेचे किती उच्चार, नुसता घोळ..'
अशी वाक्ये असा माझा समज आहे.

खरंच का असा समज आहे? मला आपल्याबाबत असे असेल असे अजूनही वाटत नाही.
असल्यास नाईलाजाने तो विकृत आहे असे म्हणावेसे वाटते.

माझे आणि तुमचे याच्या तुलनेत माझे कसे जास्त चांगले ही भावना. 
असे बिलकुल नाही! असे जर असेल तर ही भावना त्याज्यच आहे. आपण म्हणता आहात तो दुराभिमान आहे.
अभिमान ही स्वतंत्र अभिव्यक्ती आहे; दुसऱ्यावर अवलंबून नाही.
----------------------------------------------------------

"त्या"ची व्याख्या देता येत नाही असे म्हणतात... म्हणून "नेति" "नेति"च्या सूत्राचे उपयोजन केलेले आहे...

अभिमान ही अर्थातच "माझ्या"शी संदर्भ धरून आहे हे मान्य... पण त्याचा "तुला" खाली पाहण्याशी संबंध नाही. अभिमान तसा स्वस्तही नाही... आणि तो कशाचा असावा याचे तारतम्यही महत्वाचे. जे जे माझे ते ते (आणि ते तेच) श्रेष्ठच हा मूर्खपणा आहे; अभिमान नाही. माझ्या सर्वच गोष्टींचा मला अभिमान नाही. स्वतःच्या नजरेस नजरही भिडवता येऊ नये अशी सतीप्रथेसारखी परंपरा सांगणाऱ्या धर्माची मला शरम आहे.

ज्यामुळे मान खाली घालायला लागत नाही तो अभिमान - माझ्या (आणि इतर अनेकांच्याही) आईवडीलांनी स्वतः कष्टात दिवस काढून सरळ मार्गाने आम्हाला वाढविले याचा मला अभिमान आहे. 

जे जे उत्तम उदात्त उन्नत (माझ्या देशात, धर्मात काय आणि अन्यत्र काय) तो तो अभिमान.
परि अमृतातेही पैजा जिंके असे म्हणणाऱ्या ज्ञानदेवांना जो अभिमान तोच अभिमान मलाही. त्यांचा काय आणि माझा काय हा केवळ मराठीतील सौंदर्यामुळे, गोडीमुळे, समृद्धीमुळे बहरून गेल्याची, भारावून गेल्याची भावना आहे. संस्कृत याहून अधिक समृद्ध आहे किंवा फ्रेंच अधिक गोड आहे किंवा मराठीमध्ये इंग्रजीपेक्षाही अधिक उच्चार लिहिता येतात ही तुलना हा या अभिमानाचा स्रोत नाही की शरमेचे कारणही नाही.
--------------------------------------------------------

... ... अधिक काय लिहू? वादासाठी वाद ही या प्रतिसादाची प्रेरणा नाही... संवादाच्या ओढीपोटी इतपत जे लिहिले ते पुरेसे आहे.