व्यक्ती आणि वल्ली                               पु. ल. देशपांडे

पुलंचे निरीक्षण, मानवी स्वभावातील बारकावे, कंगोरे ह्यांचे वर्णन करण्याची हातोटी कल्पनातीत आहे. अशा व्यक्ती (आणि वल्ली) रोजच्या जीवनात आपल्याला भेटतात त्यांचे स्वभाव विशेषही आपल्याला जाणवतात पण त्याला शब्दरूप द्यावे पुलंनीच. पुलंनी चितारलेले कुठलेही शब्दचित्र मनावर कायम स्वरुपी कोरले जाते. एकदा वाचून कधीच समाधान झाले नाही अशा पुलंच्या अनेक पुस्तकांपैकी एक.

शहेनशहा                                         ना‌. सं. इनामदार

इतिहास लेखन करावे तर ना. सं. इनामदारांनीच. बाबासाहेब पुरंदरे, रणजित देसाई, विश्वास पाटील वगैरेंची पुस्तकेही नक्कीच वाचनीय आहेत पण ना. सं. ची शैली आणि त्रयस्थ दृष्टिकोन नक्कीच वाखाणण्यासारखा आहे. शहेनशहा ह्या पुस्तकात शिवाजी महाराजांना कुठेही कमी न लेखता सर्वसत्ताधीश औरंगजेबाचे आणि मुघलसल्तनीचे सार्थ वर्णन वाचावयास मिळते. वारंवार वाचण्यायोग्य.

आमचा बाप अन् आम्ही                             नरेंद्र जाधव

वाचून खूप दिवस झाले. त्यामुळे तपशीलात शिरत नाही. पुस्तक नक्कीच चांगले आहे.

एक होता कार्व्हर -                                 वीणा गवाणकर

संग्रही ठेवण्यायोग्य अनुवाद. टोकाच्या प्रतिकूल परिस्थितीशी झगडून समाजात मानसन्मान प्राप्त करणे, अत्यंत गरिबीत बालपण घालवूनही ऐहिक सुखाच्या मागे न धावता, प्रसंगी आलेली संधी जाणीवपूर्वक दूर सारून मानवाच्या उद्धारासाठी आयुष्य वेचणाऱ्या व्यक्तीचे चित्रण आहे. संवेदनशील आणि संस्कारक्षम पुढच्या पिढीने विशी ओलांडताना जरूर जरूर वाचावे.

आहे मनोहर तरी-                                  सुनिता देशपांडे

'आहे मनोहर तरी गमते उदास मजला' ह्या ओळींतून पुलंनीच सुचविलेले शीर्षक लाभले आहे ह्या पुस्तकाला. पुल थोर होतेच पण त्या थोरपणालाही कसा एक उणे पणा मागे आहे/होता हे ह्या पुस्तकात दिले आहे. विशेष आवडले नाही. विस्कळित, तक्राररूपी लेखन आहे. भाषा सौंदर्यही विशेष जाणवले नाही. वाचल्यास हरकत नाही न वाचल्यास फार रुखरुख लागू नये. 

लमाण-                                              डॉ. श्रीराम लागू

प्रत्येक प्रसिद्ध व्यक्तीच्या खाजगी आयुष्याबद्दल कुतुहल असते. परंतु, पुस्तकात त्याचे शमन होत नाही. (कदाचित पुस्तकाचा तो उद्देशही नाही). 'डॉ. श्रीराम लागू' ह्या अभिनेत्याच्या वाटचालीचा आलेख थोडक्यात मांडलेला आहे. एकदा जरूर वाचावा.

झाडाझडती                                          विश्वास पाटील

हे पुस्तक वाचूनही बराच काळ लोटला आहे. आदिवासीच्या खडतर जीवनावर केलेले लेखन वाचावयास मिळते. धरणग्रस्तांचे पुनर्वसन हा धागा पकडून केलेले वास्तव लेखन अंगावर काटा उभा करतं. शहरात आपले जीवन कित्येक पटीत सुखासिन आहे हे जाणवतं. विश्वास पाटलांची लेखणी ह्या विषयात सरस्वतीचे रूप धारण करते. जरूर जरूर वाचावे. 

इडली ऑर्किड आणि मी                             विठ्ठल कामत


श्री. विठ्ठल कामत ह्यांनी अथक प्रयत्न करून, दक्षिण भारतीय पदार्थांचा, 'कामत' हा ब्रँड निर्माण केला. त्यांचे धाडस, परिश्रम, दूरदृष्टी आणि आत्मविश्वास वाखाणण्याजोगे आहे. त्यांना नशिबाची साथही भरपूर लाभली. अन्यथा, त्यांच्यातील गुणविशेष अंगी पुरेपूर असणारे कित्येक जणं आहेत पण सर्वच तितके यशस्वी झाले नाहीत/ होत नाहीत. पुस्तक वेड लावत नाही. वाचले तरी चालेल नाही वाचले तरी चालेल. 

मर्मभेद                                                 शशी भागवत

'अय्यार' कलेशी निगडित. कल्पनाविलास. वाचकाची उत्सुकता वाढवत ठेवण्याची ताकद ह्या पुस्तकात आहे. एकदा जरूर वाचावे.

एम टी आयवा मारू                                  अनंत सामंत

मर्चंट नेव्हीच्या जहाजावरील जीवनाचे वर्णन आहे. अजिबात आवडले नाही. न वाचलेलेच बरे. (वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी.)

तुंबाडचे खोत -                                       श्री ना पेंडसे

भाग-१ आणि भाग-२ अशा दोन भागात खोतांच्या अनेक पिढ्यांचा, त्यांच्या अत्याचारांचा, दुराचारांचा, समज-गैरसमजांनी भरलेला जीवनालेख वाचावयास मिळतो. कोंकणच्या पार्श्वभूमीवर कथानक घडते. खास श्रीना शैली. सुंदर भाषा आणि उत्कंठावर्धक लेखन. पुस्तक एकदा हाती धरले की खाली ठेववत नाही. कोकणी जीवनशैली, कोकणी स्वभावविशेष ह्या बद्दल उत्सुकता असणाऱ्यांनी आणि श्रीनांच्या चाहत्यांनी जरूर वाचावे.

दुर्दम्य                                                  गंगाधर गाडगीळ

लोकमान्य टिळकांच्या जीवनावरील पुस्तक. अतिशय सुंदर आणि वाचनीय. टिळकांचे वैयक्तिक, सामाजिक, राजकीय जीवन, इंग्रजांशी, गांधीजींशी लढा, आगरकर मैत्री आणि दुरावा, काँग्रेस मधील मवाळ आणि जहाल मतप्रवाह इत्यादी अनेक गोष्टींसाठी हे पुस्तक वाचावे. संग्रही ठेवावे. पुन्हा पुन्हा वाचनाने वाढता आनंद मिळतो.

नाथ हा माझा                                          कांचन घाणेकर

'आहे मनोहर तरी..' प्रमाणेच तक्रारवजा लेखन. डॉ. काशिनाथ घाणेकर ह्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे खाजगी जीवन दुर्वर्तनाने भरलेले होते. त्याचाच आलेख सदर पुस्तकात आहे. 'डॉक्टरांच्या निकटवर्तियांनी त्यांचे कलागुण न पाहता त्यांच्या खाजगी जीवनातील चुकांचीच चर्चा करून त्यांना बदनाम केले' असा इतरांवर आरोप करीत कांचन घाणेकर ह्यांनीही तेच केले आहे. साहित्यिक मूल्य शून्य. टाईमपास म्हणून वाचायला हरकत नाही.

पार्टनर                                                 व पु काळे


खूप दिवसांपूर्वी वाचले आहे. एकदा वाचायला हरकत नाही. वपु लिहितात मस्त. कधी कधी (की बऱ्याचदा?) कथानकातील पात्र बोलत नसून वपु (लेखक) बोलत आहे असा भास होतो. आणि मन कथानकाच्या बाहेर पडते. हा दोष वगळता मला वपु आवडतात. वपुंची कांही वाक्ये खास असतात. कथानकाच्या शेवटी बहुधा एखादा धक्का वाचकाची वाट पाहत असतो. त्याची मजा लुटायची असेल तर शेवट आधी कधीच वाचू नये.

एक झाड दोन पक्षी                                  विश्राम बेडेकर   

माणसाला दोन मने असतात. ह्या दोन्ही मनांचे सतत द्वंद्व चाललेले असते. श्री. विश्राम बेडेकरांचे हे आत्मचरित्र म्हणावे असे लेखन आहे. एका मनाने दुसऱ्या मनाचे केलेले वर्णन, एका मनाने केलेले 'विश्राम बेडेकर' ह्या व्यक्तीच्या वागण्या बोलण्याचे, चुकांचे, घोडचुकांचे केलेले विश्लेषण असे विलोभनीय रूप ह्या पुस्तकाच्या मांडणीत आहे. संग्रही ठेवावे, वारंवार वाचावे. 

छावा                                                 शिवाजी सावंत

संभाजी महाराजांच्या जीवनावरील कादंबरी. शिवाजी सावंतांची लेखन शैली उत्कृष्ट आहे. संभाजी महाराजांच्या वैयक्तिक जीवनात अनेक चढ-उतार आहेत. स्वभावाची  अनेक दालने आहेत. कवी, योद्धा, राजकारणी, वडील असून अनाथ, मातृभक्त, सावत्र मातेच्या कारवायांचा बळी. अशी संभाजी महाराजांची अनेक रुपे लेखकाने समर्थपणे साकारली आहेत. अनेकदा वाचावे. संग्रही ठेवावे असे पुस्तक.

कान्होजी आंग्रे                                       पु. ल. देशपांडे

पुलंचा एकमेव ऐतिहासिक अनुवाद. हे पुस्तक 'पुलंचे' ह्या अपेक्षेने वाचायला घेऊ नये. हा ऐतिहासिक अनुवाद आहे. सरखेल कान्होजी आंग्रे ह्यांच्या दैदिप्यमान कारकीर्दीचा उत्कृष्ट आलेख ह्या पुस्तकात वाचावयास मिळतो. जरूर वाचावे.

महानायक                                           विश्वास पाटील

कॅ. सुभाषचंद्र बोस ह्यांचा जीवनपट उलगडणारे पुस्तक. वाचण्यासारखे आहे. थोडे पाल्हाळिक आहे. पृष्ठसंख्या कमी करता आली असती. तरी पण महानायकाच्या संपूर्ण दर्शनाची तहान हे पुस्तक भागवितं. जरूर वाचावे.

धन्यवाद.