सर्वप्रथम हा उपक्रम सुरू केल्याबद्दल कोंबडींचे आभार.
त्याच्या बद्दल म्हणाल, तर तो काहीच करत नाही. (क्रियेविण वाचाळता वगैरे..)
पण कल्पनांबद्दल म्हणाल तर,
मनोगतावरच (मेधदूत बहुदा) यांनी सुचवलेली एक कल्पना त्याला व्यक्तिशः आवडली. सिग्नलपाशी पैसे मागण्यास येणाऱ्या मुलांना पैशा ऐवजी
(जो बऱ्याचदा त्यांच्या हाती लागत नाही.) चॉकलेट देण्याची ती कल्पना होती. यात काही क्षणा पुरता का होईना त्यांना हा वेगळा आनंद आपण देऊ शकू. (अर्थात हा भाकरी मिळत नाही तर पुरी खा म्हणण्यापेक्षा वेगळा प्रकार आहे असे त्याला वाटते.) या ही पुढे जाऊन त्यांनी १ ते १० पाढे म्हणू शकणाऱ्या वा रस्त्यावर्रील फलक वाचू शकणाऱ्यास प्राधान्य देण्याची वृत्ती दाखवताच काही मुले काही काळानंतर जुजबी वाचन करू लागली असाही काहिसा अनुभव त्यांना आल्याचे त्यांनी म्हटले होते.
दुसरी कल्पना त्याला मार्क टुलीच्या एका लेखात सापडली ज्यात बलवानासमोर मान तुकवत कमकुवतांवर कुरघोडी करण्याच्या भारतीय वृत्तीचे दर्शन घडवले होते. साध्या २ रुपयांसाठी भाजीवालीशी ५-१० रुपयांसाठी रिक्षावाल्याबरोबर भाडणारा भारतीय फसवणूक करणाऱ्या कंपन्याच्या (टेलिकॉम सेवादाते इत्यादींच्या) मुजोरी कडे दुर्लक्ष करतो असे दिसते. त्याने याचा सोयीस्कर अर्थ घेत, जर विक्रेता आपणास जाणून बुजून फसवत नाही, वा गैरफायदा घेत नाही असे वाटल्यास किंवा विक्रेता गरजू आहे असे भासल्यास धासाघीस न करण्याचा निर्णय घेतला. या उलट मोठ्या खरेदाऱ्या करताना, वा मोठया संस्थांशी व्यवहार करताना शक्यतितके कौशल्यपणाला लावून, माहिती जमा करून वस्तू योग्य भावालाच घेतली जात आहे नि आपण लुबाडले जाणार नाही याची खातरजमा करण्यास प्रारंभ केला. (ज्याचा आर्थिक लाभही आहेच.) ग्राहकांच्या हक्कांवर गदा आणणाऱ्या प्रत्येक बलाढ्य विक्रेत्याविरूद्ध शक्य तेथे आवाज उठवणे हे ही करता येण्यासारखे.
तो यातील करतो काय म्हणाल, तर पैसे गमवण्याचे पर्याय आहेत ते जमून जातात, लढा देणे वगैरे साठी अळंटळं होते.
म्हटले, आपणांसी जे ठावे....
इतरांनी आपण कशी मदत करतो हे सांगतानाच तशीच मदत करू इच्छिणाऱ्या मनोगतींना उपयुक्त होऊ शकेल अशी सर्व माहिती, कुठे मदत करावी, संपर्क कुणाशी करावा इत्यादी माहिती इथेच द्यावा ही विनंती.
तो पुरेशी देशसेवा करत नाही याची त्याला जाणीव आहे. पण जिथे तिथे श्रद्धा व सबुरीचे फुकटचे सल्ले देण्याचे काम मात्र चोख बजावतो. बाकी प्रत्येकाने आपले काम 'प्रामाणिकपणे' करणे, अप्रामाणिकपणाचा सोपा, धोपटमार्ग टाळण्याचे धाडस दाखवणे ही देखील मोठी देशसेवा ठरेल असे वाटते.