विषयांतर होते आहे पण सांगितल्याशिवाय राहवत नाही.
गालिबने आयुष्यात स्वतःपेक्षा कधी कुणाला श्रेष्ठ मानले नाही.
एकदा जवळपास मानले होते त्याविषयी एक ऐकलेली /आठवलेली गोष्ट -
मोमिन खां "मोमिन" चा एक शेर
तुम मेरे पास होते हो गोया
जब कोई दूसरा नहीं होता
ऐकून ग़ालिब इतका भारावून गेला म्हणे की तो मोमिनला म्हणाला "तुम मेरा पूरा दीवान ले लो, और येह एक शेर मुझे दे दो"
[या शेराचा म्हणायला अर्थ द्यायचा तर - जेव्हा माझ्या आसपास इतर कोणी नसते, तेव्हा जणू काही तूच माझ्या जवळ असतेस.
पण मीहून आधीच सांगतो की माझ्या मते हा शेर जाणवायचा किंवा अनुभवायचा आहे, शब्दार्थ करून वाहवा करण्याचा नाही.
या शेराचा अर्थ किती खोलवर झोंबतो हे समजावून देणे माझ्या शक्तीबाहेरचे काम आहे. कदाचित भालचंद्र नेमाड्यांची "जरीला" कादंबरी ज्यांनी समरसून वाचलेली आहे त्यांना याचा अहसास झाला असेल.
ज्यांना ते सहजासहजी प्रतीत होणार नाही, त्यांनी एका पारड्यात हा शेर व दुसऱ्या पारड्यात ग़ालिबचा दीवान हे वजन स्वतः ग़ालिबनेच केलेले आहे एवढेच पाहिले तरी पुरे.
बाय द वे, नेमाड्यांनी त्या पुस्तकाच्या पहिल्या कोऱ्या पानावर हाच शेर उद्धृत केला आहे. मोमिनला व नेमाड्यांनाही माझा प्रणाम.]