देशसेवा, समाजसेवा वगैरे शब्द खूपच मोठे आहेत माझ्यासाठी. असं काही ग्रेट करण्याची माझी कुवत नाही. माझ्या वैयक्तिक/व्यक्तिगत कारणांमुळे प्रेरीत होऊन बहुदा मी काही गोष्टी केल्या आहेत आणि काही करते आहे आणि करतही राहीन.. पण केवळ देशाच्या/समाजाच्याच भल्याचा विचार करून अशा गोष्टी करण्याइतका मनाचा मोठेपणा माझ्यात नाही बहुदा. स्वार्थीपणा सुटत नाही माझ्यासारख्या ऐहिक सुखांना चटावलेल्या व्यक्तीला.. काय करणार.. :-(
मला आसपासच्या लोकांपैकी कोणी धुम्रपान, अपेयपान वगैरे करत असल्यास त्याचा अत्यंत त्रास व्हायचा-होतो-होईल. अशा लोकांशी मैत्रीही न करण्याचा माझा पक्का निर्णय असायचा, ओळख झालीच तरी हाय-हॅलोपुरतीच ठेवणे हा कडक निश्चय. अशातच एकाशी ओळख झाली की ज्याला धुम्रपानाच्या ह्या सवयीमुळे त्रास होत होता आणि ती सवय सोडण्याची मनापासून इच्छा तर होती, पण तसा प्रयत्न करता होणाऱ्या त्रासातून सुटका मिळवण्याचा काहीच उपाय न सापडल्याने परत त्या दुष्टचक्राला सुरूवात होत होती. जबरदस्त हुशार आणि छान स्वभावाच्या ह्या सहकर्मचाऱ्याकडून ( ज्याला मी आजतागायत प्रत्यक्षात भेटलेली नाही ! )याबद्दल त्याला मदत करण्याचा मी चंग बांधला आणि त्याच्याच मनोशक्तीचा आणि इतर आवडींचा ( जसं की क्रिकेट, लॉजिकल रिझनिंग, पोहणे, हिंदी शिकणे वगैरे ) वापर करून घेऊन त्याची ही सवय पूर्णपणे सोडवली. स्वतःत मुरलेल्या वाईट गोष्टीला कायमचा रामराम ठोकणाऱ्या या जबरदस्त चिकाटीच्या माझ्या लढवय्या दोस्ताला सलाम ! आता कुठल्या व्यसनाधीन परंतु चांगल्या स्वभावाच्या माणसाचा, ज्याला ही वाईट सवय सोडण्याची मनापासून इच्छा आहे, मला तिटकारा वाटणार नाही आणि त्यातून बाहेर निघण्यासाठी मदतीचा हात पुढे करायला जमेल, याची खात्री वाटते. व्यसनमुक्तीत मदत करण्याचे असे प्रयत्न पुढेही चालू ठेवायला मला खूप आवडेल.
माझे वडील लहानपणापासून पोलिओग्रस्त आहेत म्हणून म्हणा किंवा लहान मुलांबद्दल मला वाटणारा लळा म्हणा, पोलिओविरोधी प्रत्येक कार्यक्रमाला होईल तितकी होईल तशी मदत करण्याचा माझा प्रयत्न असतो. पोलिओ लसीकरणाच्या कार्यक्रमात स्वयंसेवी बनून असो किंवा मी रहाते तिथल्या लोकांमध्ये जनजागृती करणे असो किंवा जवळपासच्या झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन तिथल्या लोकांना समजावून सांगणे असो, हे करण्यात मला खूप समाधान मिळते.
वडलांची आई आणि आईचे आईबाबा असूनही घरगुती मतभेदांमुळे मला लहानपणापासून अनुभवायला मिळाली ती फक्त बाबांची आई - आऊच. आजोबांसाठी माझा जीव नेहमीच आसुसलेला राहिला, तो आजतागायत ! या भावनेतूनच की काय आजीआजोबा आणि त्यांचं प्रेम मिळवण्यासाठी धडपडणारा माझा जीव जिथे रहायला जाईल तिथल्या वृद्धांमध्ये जाऊन मिसळतो. याच भावनेमुळे जमेल तेव्हा मी वृद्धाश्रमांमध्ये जाऊन गप्पा मारणे, विविध कार्यक्रम, अंताक्षरीच्या स्पर्धा ( ज्यात मी धडाकेबाज चित्रपट गाणी, भावगीते, भक्तीगीते वगैरे म्हणते माझ्या स्मरणशक्तीनुसार तर विरोधी टीम भजन, अभंग, पोवाडे वगैरे हाय फंडू चीजा गातात ! एकूणातच एकदम धमाल मजा येते ! कोणाचा स्टॉक जास्त यावर जब्बरी इरेला पेटतो आम्ही सगळेजणं.. शेवट अर्थातच होत नाही या खेळाचा.. आजतागायत To be continued.. किंवा फिर मिलेंगे ब्रेक के बाद असंच म्हणतो एकमेकांना.. :D ) करत असते. पत्त्यांच्या वगैरे डावात आजोबांविरुद्ध जिंकल्यास आजीच्या हातची कोथिंबिरीची वडी मिळते ! क्या बात है !! कलिजा एकदम खल्लास !!!
लहान मुलांचा जबरदस्त लळा आहे मला, त्यामुळे आसपासच्या कामकरी बायकांच्या मुलांची सुट्टीच्या दिवशी शिकवणी घेणे, त्यांच्याबरोबर खेळ खेळणे, त्यांचे वाढदिवस साजरे करणे यात खूप आनंद होतो. बक्षिस म्हणून त्यांना एक कॅडबरी घेऊन दिली तर त्यातला एक छोटासा तुकडा काढून जेव्हा ती मुले मला म्हणतात,"हे घे तुला !", कोण आनंद होतो सांगू !
लहानपणापासून घरात हिशोब, रिटर्न, पैसे, गुंतवणूक वगैरे गोष्टी अनुभवल्या असल्याने आताशा अगदी रक्तातच भिनल्या आहेत. माझ्या दोस्तांना "इन्कम टॅक्स रिटर्न भरलंस का? " हा प्रश्न तर दरवर्षी असतोच माझ्याकडून. उत्तर नकारात्मक मिळालं तर "अजिबात हक्क नाही तुला माझ्या भारतात रहाण्याचा .. आऽऽधी निघायचं बघायचं बाहेर माझ्या भारतातून !" असे शब्द आमच्या कट्ट्यात ऐकावे लागतात त्यांना. आता प्रत्यक्ष कट्टा तर होत नाही, पण व्हर्च्युअल कट्ट्यात हा डायलॉग मात्र तसाच आहे. आता तर कामानिमित्ताने भारताबाहेर असलेले दोस्तसुद्धा गंमतीने "नाही" उत्तर देऊन माझ्याकडून वरील उत्तर मिळता,"अगोदरच बाहेर आहे मी भारताच्या पण तरीही मी भरला आहे इन्कम टॅक्स.. आता बोलावतेस का मला तुझ्या भारतात?" असं म्हणतात ! नीटसे प्लॅनिंग न केल्याने उगाचचा टॅक्स भरल्यास तशीही केस चालवली जायची आमच्या दरबारी, आणि पुढील वर्षी हकनाक जास्तीचा टॅक्स भरावा लागू नये म्हणून आवश्यक काळजी घेऊ याची कबुली घेऊनच सुटका व्हायची. कबुलीची नीट अंमलबजावणी होते की नाही हेही बघितलं जायचं !
रक्तदान करायला कधी पात्र होते याची वाट मी लहानपणी दूरदर्शनवर त्याबद्दलची जाहिरात बघूनच बघत होते, पण माझ्या आयुष्यात 'मयुरी' आली आणि खऱ्या अर्थाने काळजात कालवाकालव होऊन रक्तदानाची महती कळली. आता न चुकता वर्षातून कमीतकमी २ जास्तीतजास्त ४ वेळेस चांगल्या रक्तपेढीत रक्तदान करतेच. इतरांनाही याबद्दल उद्युक्त करायचा प्रयत्न केला पण जास्त यशस्विता नाही मिळवू शकले.
चु.भू.द्या.घ्या.