सध्या जिकडे तिकडे आरक्षण विषयक आंदोलनांनी जोर धरला आहे. त्या अनुषंगाने "दोन ध्रुव" बद्दल लिहितो-

      सामाजिक विषमतेवर भाष्य करणारी,  मराठीतले पहिले ज्ञानपीठ विजेते साहित्यिक वि. स. खांडेकर यांची ही कादंबरी.  ही कादंबरी लिहून आता सत्तर  वर्षे उलटून गेली असली तरी यातला विषय आजही ज्वलंत आहे. यातील समाजाविषयी, धर्माविषयी आणि कलेविषयी केलेले वैचारिक चिंतन यापुढील २०० वर्षे  स्थल-काल मर्यादेशिवाय कोणत्याही समाजात उपयुक्त ठरावे.
               कादंबरीचा विषय गंभीर असला तरी खांडेकरांच्या कल्पकतेमुळे ही कादंबरी  मनोरंजक ही आहे. कथेतील सर्व महत्वाची पात्रे कलाकार, हरहुन्नरी आहेत. एक कथालेखक "रमाकान्त" आणि चित्रकार "सुलोचना" यांच्यातलं प्रेम आणि तितकीच मोठी 'दरी' या कथेतून दिसते. 
               कोकणातले निसर्गसोंदर्य, राहणीमान, परंपरा या सर्वांचा उपयोग मोठ्या कल्पकतेने केला आहे. काजूचा कारखाना, त्यामधे नवीन शोध लावून तो लपवून ठेवणारा तंत्रज्ञ यांच्या वर्णनातून गरिबी, अज्ञान, अंधश्रध्दा यातून आलेली विषमता अधिकच दृढ होत जाते.

यातली  दोन  वाक्ये  पाहा-

"कला आणि जीवन , पांढरपेशे व कामकरी, भोग व त्याग- दोन ध्रुवच खरे! त्यांच्यातील भयंकर अंतरामुळेच जगातील सर्व दुःखे उत्पन्न झाली आहेत"

"जगात सामान्य आणि असामान्य यात दोन ध्रुवांचे अंतर राहाणारच"

 कलेसाठी कला नसून कला जीवनासाठी आहे हे खांडेकरांचे तत्वज्ञानही या  कादंबरीतून प्रकट झाले आहे.