कोणत्याही क्षेत्रातले एखाद्या व्यक्तीचे यश हे (दुर्दैवाने) त्या व्यक्तीच्या ऐहिक यशाशीच जोडले जाते. उत्तम गुणवत्ता असून व्यावहारिक चलखी न जमल्यामुळे 'अयशस्वी' असा शिक्का बसलेले लोक आपल्याला प्रत्येक क्षेत्रात आढळतात.

तलत हा कोणत्याही मापदंडाने अयशस्वी नव्हता. पण त्याच्या आवाजाची जाण त्याच्या समकालिन संगीतकारांनाही म्हणावी तेवढी झाली नाही. मदनमोहन, सी. रामचंद्र ( लेखातील यादीत विसरलेले 'यास्मिन' मधील अविस्मरणिय 'बेचैन नजर' आणि त्यातले मेंडोलीनचे जीवघेणे पीसेस!), गुलाम महंमद, अनिल विश्वास, सलील चौधरी , सज्जाद,सरदार मलिक ( परत हे ही संगीतकार लौकिकार्थाने दुसऱ्या फळीतलेच!) हे संगीतकार सोडल्यास इतरांनी तलतला योग्य न्याय दिल्याचे दिसत नाही. शंकर जयकिशनने तलतला वापरून लोकप्रिय गाणी दिली, पण त्यात त्यांचा 'क्लास' दिसत नाही. नौशाद, सचिनदा यांनी तर तलतचा जाणवण्याइतपत कमी वापर केला ( तेही सचिनदा नवकेतनचे संगीतकार असूनही आणि देव आनंदला तलतचा आवाज चांगला 'सूट' होतो, हे 'टॅक्सी ड्रायव्हर' पासून सिद्ध झाले असताना - त्यांना 'हम बेखुदी में तुमको' किंवा 'दिन ढल जाये' साठी तलतचा विचार करावासा वाटला नाही ).  त्या अर्थाने तलत हा 'सेकंड फिडल सिंगर' राहिला. दर्जाचा इथे प्रश्नच नाही.

हेमंतदाविषयी लताबाईंनी म्हटले आहे की त्यांचा आवाज ऐकताना एखादा साधू मंदिरात बसून गात आहे, असे वाटत असे. त्यामुळे हेमंतदांच्या गळ्याला हलकीफुलकी रोमँटिक गाणी अपवादानेच शोभून दिसली. ( 'ओ मेरे दिल के चैन'.. ची आपण हेमंतदांच्या आवाजात कल्पना करू शकतो का?)

तलत मूळचा लखनौचा. शास्त्रीय संगीताचं त्याचं शिक्षण लखनौच्या मॉरिस विद्यालयात ( भातखंडे म्यूझिक कॉलेज ) मध्ये झालं.लखनौ रेडीओवर गात असताना त्याला एच. एम.व्ही. तर्फे  गायक म्हणून निवडण्यात आलं होतं. तलतच्या गायकीची सुरुवात झाली ते कलकत्त्यात. तिथं त्यानं काही फिल्मी ( उदा. 'जाग मुसाफिर जाग' चित्रपट राजलक्ष्मी ), बरीच गैरफिल्मी ( उदा. ' तसवीर तेरी दिल मेरा बहला न सकेगी') आणि बरीच बंगाली गाणी गायली. त्या काळात तो 'तपनकुमार' या नावाने गात असे.या अर्थानं त्याची पार्श्वभूमी बंगाली.

'तलत इन ब्ल्यू मूड' ही खरोखर एकट्याने ऐकणाची चीज आहे.  द्वंद्वगीते ऐकताना माझी तरी जरा पंचाईत होते.' इक ऐसी आग लगी मन में, जीने भी न दे मरने भी न दे... ' या टीपेला गुणगुणतानाही माझा आवाज फाटतो. त्यामुळे अशा वेळी साथ द्यायला 'ती' असेल तर बरे. नाहीतर आहेच आपले 'एकला चलो रे..'

'देवमाणूस' यांनी ओ.पी आणि तलतच्या गाण्याविषयी विचारले आहे. ' सोने की चिडीया' ला ओ. पी. चे संगीत होते. ( 'प्यार पर बस तो नही है..' 'प्यास कुछ और भी भडका दी झलक दिखलाके..' इ. सुंदर गाणी)

जाता जाता: तलतची द्वंद्वगीते ही सहसा आनंदी, तर एकट्याने म्हटलेली गीते ही सहसा गंभीर, बरेचदा दुःखमय असतात (अपवाद: 'तुम तो दिल के तार छेड़कर', 'राही मतवाले'), या निरीक्षणाबाबत काय वाटते?

'राही मतवाले' हे द्वंदगीत आहे (सुरैया -वारिस)

तलतची एकट्याचीही आनंदी मूडमधील चांगली गाणी आहेत, पण कमी. तलतने आपल्या एका मुलाखतीत म्हटले आहे की माझ्या सर्व गाण्यांचे तत्वज्ञान हे शेलीच्या 'अवर स्वीटेस्ट साँगज आर ऑफ अवर सॅडेस्ट थॉट्स' या ओळीवर आधारित आहे. तलत हा 'ब्ल्यू मूड' चा शहेनशहा समजला जातो तो यामुळेच.

आपल्या सर्वांच्या प्रतिसादाबद्दल आभारी आहे.

सन्जोप राव