शिरीष कणेकर यांच्या 'यादोंकी बारात'(राजा प्रकाशन, २री आवृत्ती) या पुस्तकातून उद्धृत-
"मै पगल मेरा मनवा पागल"
परमेश्वरानं माणसाला दिल दिलं. आणि मग या दिलाला पाझर फोडण्यासाठी रडवण्यासाठी नि रक्तबंबाळ करण्यासाठी तलत मेहमूद नावाचं मोरपिशी शस्त्र अवनीवर धाडून दिलं. दर्द हा तलतच्या गाण्याचा आत्मा आहे. कारुण्य हे त्याच्या आवाजाचं मर्म आहे. तागडी घेऊन सूर तोलणाऱ्या बनियांसाठी किंवा स्वरांचं विच्छेदन करणाऱ्या मुडदेफरासांसाठी ही हळवी, हळुवार रुलानेवाली कातर चीज नाही. हा खास दिलवाल्यांचा सवतासुभा आहे. आयुष्याचा काटेकोर हिशेब मांडणाऱ्या बुद्धिवादी कारकुंड्यांना इथं मज्जाव आहे.
निर्व्याज आनंद आणि निर्भेळ सुख तलतच्या वाट्याला कधीच येत नाही. सुखाचा एखादा कवडसा चुकून पडलाच तर तो दुःखाचं कोठार उजळण्यापुरताच. अपार दुःख आणि व्यथा त्याच्या पाचवीला पूजलेल्या असतात. ठेच लागल्याशिवाय एक पाऊल पुढे पडत नाही. भाकरीचा तुकडा आसवांनी भिजवूनच खावा लागतो.
तलतची प्रियतमा नेहमी त्याला सोडून दूर कुठं तरी गेलेली असते.
सैगलप्रमाणं गायक-नट होण्याची तलतची महत्त्वाकांक्षा होती. ...त्याची भूमिका असलेले सर्व चित्रपट पडले. त्यानं कधी चित्रपटाल संगीत दिलं नाही. स्वतःचं संगीतकार म्हणून नाव न देता आपल्या अनेक खासगी गीतांना आणि गझलांना त्यानं संगीत दिलंय.
अनिल विश्वास हा सर्वश्रेष्ठ संगीतकार होय या मतापासून, सी. रामचंद्र हा राजा माणूस आहे या श्रद्धेपासून, व लता मंगेशकर शतकातून एखादीच होते या विश्वासापासून तो कदापि तसूभरही ढळला नाही. बदललेल्या काळाची पावलं तलतनं स्पष्ट ऐकली, पण 'है सबसे मधुर वो गीत जिन्हे हम दर्दके सुरमे गाते है' या विचारसरणीला तो कवटाळून बसला आणि उदबत्तीसारखा विझून गेला.
तलबरोबर एक युग संपलं. एका भावयात्रेचा अंत झाला. या यंत्रयुगातील एका आर्त, नाजूक भावनेचा चेंदामेंदा झाला.
(प्रकाशनाचे हक्क सौ. भारती कणेकर)
===
टीपा-
१. उतारे जसेच्या तसे उद्धृत केले असल्याने शुद्धलेखनात/शब्दांत सुधारणा केलेली नाही.
२. सदर उताऱ्यांतील माहिती आणि मते मूळ लेखकाची आहेत. त्याच्याशी प्रतिसाद-लेखक (आणि वाचक) सहमत-असहमत असू शकतो.
३. या मूळ लेखाच्या प्रकाशनाचे हक्क मूळ प्रकाशकांकडे शाबूत आहेत आणि त्याची योग्य ती नोंद या प्रतिसादात घेण्यात आली आहे.
४. प्रकाशनहक्क कारणास्तव मूळ लेख जसाच्या तसा न देता त्यातले फक्त उतारे उद्धृत करण्यात आले आहेत.