मी मतदान करत नाही, कारण मला माझे मत मिळवण्याच्या उंचीचे कार्य एकही उमेदवार करत असल्यासारखे वाटत नाही. ( अपवाद : मला नुकताच मतदानाचा हक्क मिळाला होता तेव्हा आवेशात घरातल्या इतर सर्वांबरोबर गेले होते मतदान करायला. ज्या उमेदवाराला मी व्यक्तीशः अगदी छान ओळखत होते त्याला मत देऊन मोकळी झाले होते तेव्हा. 'दिसतं तसं नसतं..' कळून मी निर्णय घेण्यात फसले हे लक्षात येता मतदानाचा हक्क चुकीच्या पद्धतीने वापरल्याबद्दल खूप हळहळ वाटली होती, पण बाण धनुष्यातून निघून गेला होता. )

मी शेवटी जेव्हा मतदानकेंद्रावर गेले होते ते 'एकही उमेदवार मला योग्य वाटत नाही म्हणून मी मतदान करू इच्छीत नाही.' हे नोंदवायला. करायचं नसेल मतदान तर नका करू पण अशी काही सोय नसताना उगाच असं काही बोलून इतरांना भडकवू नका असं म्हणून माझी हेटाळणी करण्यात आली. नोकरीच्या निमित्ताने परत कार्यक्षेत्री परत जायचे असल्याने त्या XXXXXशी हुज्जत घालायला मला वेळ झाला नाही आणि माझा एक महत्त्वाचा हक्क वाया गेला. अशी नोंदणी करायला एक फॉर्म असतो अशी खात्रीशीर माहिती मिळाली होती माझ्या एका दोस्ताकडून, पण तो कुठे उपलब्ध असतो वगैरे काही कल्पना नाही. कोणास याबद्दल माहिती असल्यास खुलासेवार सांगावे, ही विनंती. असा काही फॉर्म असल्यास आणि तो देण्याचे कोणी टाळल्यास ( टाळण्यामागे काय कारण असू शकेल? ) काय करावे, याबद्दलही मार्गदर्शन केल्यास सोनेपे सुहागाच.

इथून पुढेही कधी मतदानाचा हक्क बजावता येईल अशी आशा वाटत नाही. तशी सुवर्णसंधी मिळाली तर मला खूप आनंद होईल.

पाण्याचा जपून वापर यावरून आठवलं, जमेल तितकं मीही सर्वच जीवनावश्यक वस्तू जपून वापरायचा प्रयत्न करते, पण नुकतीच मी एका वॉटर पार्कमध्ये जाऊन मनसोक्त धमाल करून आले. मनोगतवर उपस्थित केलेले पाण्याचे प्रश्न पाहून, वॉटर पार्कमध्ये पाण्याची नासाडी होते अशी भावना होते आहे माझी. मी तिथे जाऊन तिकिट काढून त्यात सहभागी होऊन त्या नासाडीला मदतच केली का, असा प्रश्न आता मला पडला आहे. कोणी कृपया यावर काही प्रकाश टाकू शकेल का? भूतकाळ बदलवणे जमणार नसले तरी भविष्यात कसं वागायचं हे नक्कीच ठरवू शकेन, यासाठी हा खटाटोप.

मूळ मुद्द्यांसाठी पंकज यांचे आभार.