केलेले चांगले कार्य आणि दान हे करायचे आणि आपण हे केले या समाधानात विसरून जायचे. ते गायचे कशाला?

यापेक्षा काय करत येईल ते पाहायला हवे. जे आपण केले असेल ते केले असे न म्हणता 'हे करून पाहावे/ हे सहज शक्य आहे' असे सांगीतले तर उत्तम. अर्थात जो सुचवेल त्याने ते केलेले असले पाहिजे वा करावे असे बंधनकारक नाही.

माझ्या कडुन सूचनाः

कुणाच्या लग्न समारंभाला गेले नाही तरी हरकत नाही पण कुणी गेल्याचे समजताच तिथे अंत्यसंस्काराला अवश्य जावे. तिथे आपली खरी गरज असते. रुग्णालय, रुग्णवाहिका, शववाहिका, स्मशान, पोलिस, पालिका, अंत्यविधीचे सामान, लांबच्या नातेवाइकाना घेउन येणे, निरोप देणे अशी असंख्य कामे वाट पाहात असतात आणि घरातील मंडळी शोकमग्न असतात, अनेकदा मृताच्या घरी/ नात्यातले वयोवृद्ध असतात आणि अशी धावपळ त्याना जमणारी नसते. चौथ्या मजल्यावर मृतदेह आहे, उदवाहन नाही आणि अरुंद जीने अशा परिस्थितीत चार परक्या व धडधाकट माणसांची गरज असते. अनेकदा रुग्णालयात मृतदेह ताब्यात देताना सोपस्कारांची दिरंगाई चालते, दुर्लक्ष केले जाते तेव्हा मग चार 'प्रेमाचे  कौतुकाचे' बोल बोलल्याशिवाय काम होत नाही आणि हे मृताचे नातेवाईक करू शकत नाहीत. तेव्हा नात्यात वा ओळखीतच नव्हे तर आसपास कुठेही असा प्रसंग आला तर जाउन या, गरज नसेल तर परतता येते पण गरज असेल उपयोग होतो.