आमच्या घरात तरी सारखा टीव्ही बघण्याचा सोस कोणालाच नाही ( अर्थसंकल्पाच्या काळात बाबांना सोडलं तर ! ), पण तरीही काही काळापुरता टीव्ही लावला असता त्यावरील एखादे गाणे आवडल्यास ( ज्यात काहीही आक्षेपार्ह्य शब्दयोजना किंवा चित्रीकरण नाही ) त्यात काही वावगे आहे असेही वाटत नाही. रामनामाचा जप आवडणे ही निरतिशय सुंदर गोष्ट आहे, परंतु एखादे चित्रपटगीत आवडले म्हणजे खूप काही अनर्थ घडला अशातलाही भाग नाही.
आमच्या समीरला नेहमीच्या आरत्यांसोबतच गणपतीस्तोत्र आणि हनुमानस्तोत्रदेखील अस्खलित म्हणता येते. रामरक्षा आणि गणपत्यथर्वशीर्ष थोडे मोठे आणि उच्चारांसाठी जरासे क्लीष्ट असल्याने पाठ व्हायला वेळ लागेल, पण त्यातही तो लवकरच बाजी मारेल यात तिळमात्र शंका नाही.
पारंपारीक गीतसंगीत, शास्त्रीय गीतसंगीत, पाश्चात्य गीतसंगीत..... खरंच कलाकृतीला असं विभागता येतं का? जे मनाला भावतं त्यात काही आक्षेपार्ह्य नसेल तर खुल्या मनाने स्विकारायला का कमीपणा वाटतो. स्वतःला आवडत नसेल तर इतरांच्या आवडीला नावे ठेवण्यात का धन्यता वाटते? वाईट कृत्ये करणाऱ्यांना शासन जरूर करावे, पण केवळ कलाकृतीची मांडणी/धाटणी आवडली नाही म्हणून त्या व्यक्तीला धारेवर धरणे कितपत बरोबर आहे? आजचं धमाल हीट गाणं ( माझ्या मते ) दिल विच हलचल कर गई.. अखियोंसे गल कर गई.. ! ह्या गाण्याने नाचण्याचा जो उत्साह संचारतो तो जबरदस्त दुखणाऱ्या पायाला दुखणं विसरून त्या व्यक्तीला नाचायला लावण्यात, पाय परत पूर्ववत् होण्यासाठी जबरदस्त उमेद उभारण्यात यशस्वी ठरू शकतो, असे मी म्हटल्यास हसू येईल कदाचित तुम्हाला, पण हे मी स्वतः अनुभवलं आहे !
ए.आर.रहमान, सुनिधी चौहान, सोनु निगम, सुखविंदर सिंग, हिमेश रेशमिया,अजित कडकडे वगैरेंसारखे कलाकार तितके दिग्गज नसतील जितके या गीतसंगीताच्या दुनियेत बालगंधर्व, कुमार गंधर्व, आण्णा, जितेंद्र अभिषेकी, लताआशा, रफी वगैरे होते/आहेत/असतील, पण याचा अर्थ असा नाही की त्यांची कलाकृती कोणाला आवडूच नये, किंवा आवडली म्हणजे त्यांना दुसऱ्या यादीत नमूद केलेल्या कोणाचीच कलाकृती आवडत नसणार किंवा त्यांची गहराई कळली नसणार. माझ्या मते असे विभाजन करताच येऊ शकत नाही.
माझ्या मते, एका कलाकाराच्या कलाविष्कारांच्या उत्तुंगतेचे वर्णन करताना अतीव सुंदर शब्दांची बरसात करताना न थकणाऱ्या लोकांनी दुसऱ्या ( त्यांना न आवडणाऱ्या ) कलाकाराच्या कलाकृतींबद्दल बोलताना तितक्याच वाईट दर्जाचे शब्द वापरावेत, ही खरंच चांगली गोष्ट नाही. वैयक्तिक नावड चांगल्या शब्दातही सांगता येऊ शकते, असे मला वाटते. चु.भू.द्या.घ्या.