'उत्तरप्रदेशातील लोकांची मातृभाषा हिंदी आहे. ते हिंदी व इंग्रजी या दोनच भाषा शिकतात. मग तमिळ लोकांना तीन भाषा शिकण्याची सक्ती का?' असा निरुत्तर करणारा प्रश्न मला माझ्या एका तमिळ रूपाने विचारला होता. मीही तिला अनुचीच शंका विचारली होती. तिचे हिंदीप्रभुत्व आम्हा सगळ्यांहून जास्त होते (कारण ती केंद्रिय विद्यालयाच्या पहिलीपासून हिंदी शिकवणार्‍या शाळेत शिकली होती). 

भाषा शिकण्याच्या बाबतीत इतर भाषिक (कन्नडिगा, तेलुगू, मल्याळी) तितके खळखळ करत नाहीत हे प्रवासींचे मत मलाही पटते. नोकरीला लागल्यावर माझा पहिला 'नेता' (पीएल) कानडी-तेलुगू होता. मला इंग्रजी बोलता येत नव्हते! त्याला हिंदी येत नव्हते. तो हळूहळू माझे ऐकून हिंदी शिकला. (मी मात्र सरळ इंग्लंडला येऊनच इंग्रजी बोलायला शिकले.) पुढे त्याचे लग्न झाल्यावर त्याच्या पत्नीकडून त्याने हिंदी शिकणे सुरू ठेवले. पण त्यातून झाले असे की तो सगळे स्त्रीलिंगी बोलू लागला! लोक पुष्कळ हसत. पण ते मनावर न घेता तो आता नीट शिकला आहे. त्याच्यामते चांगला नेता होण्यासाठी हे कष्ट आवश्यक आहेत!

'आंग्लभाषा बोलणारे उच्च लोक' हा समज महाराष्ट्रातही तितकाच आहे असे मला वाटते. तमिळ लोक किमान स्वतःच्या भाषेचा अभिमान बाळगतात. आपल्या लोकांना मराठी बोलायचं म्हणजे 'किती बॅकवर्ड फील होतं ना!'