पण याचा अर्थ असा नाही की त्यांची कलाकृती कोणाला आवडूच नये, किंवा आवडली म्हणजे त्यांना दुसऱ्या यादीत नमूद केलेल्या कोणाचीच कलाकृती आवडत नसणार किंवा त्यांची गहराई कळली नसणार. माझ्या मते असे विभाजन करताच येऊ शकत नाही.

सहमत.

वैयक्तिक नावड चांगल्या शब्दातही सांगता येऊ शकते

सहमत.

पारंपरिक गीतसंगीत, शास्त्रीय गीतसंगीत, पाश्चात्य गीतसंगीत..... खरंच कलाकृतीला असं विभागता येतं का?

येत असावं असं वाटतं.

अशी विभागणी करता येत नसेल तर एखाद्या लहानग्या चिंटूने घरात भांडी बडवून केलेला ठणाणा आवाज, आदिवासींनी बडवलेले ढोल, पंडितजींचा घटम्, यान्नीचा वाद्यवृंद, झुबिन मेहताचा वाद्यवृंद आणि हिमेशच्या वाद्यवृंद एकाच तागडीत तोलावे लागतील.

आणि जर का हे सर्व संगीत एकाच तागडीत तोलता येणार नाही असे पुसटसे जरी वाटले तर मग संगीताची विभागणी शक्य आहे असे मानायला हरकत नाही. (प्रूफ बाय काँट्रॅडिक्शन!)

===

आणखी थोडे-

काही जणांना एखाद्या ठेक्यात ढोल वाजवणे, काही जणांना एखाद्या चालीत संगीत वाजवणे आणि त्या चालीत चार शब्द बोलणे हे गाणे वाटू शकते तर काही जणांना आरोह-अवरोह आणि सुरांच्या हरकतींत मजा वाटू शकते. प्रश्न रुची आणि अभिरुचीचा आहे. ज्यांनी अभिरुची जोपासली आहे त्यांना काही प्रकारचे संगीत अभिरुचिहीन वाटणे सहज शक्य आहे.

दोन कलाकारांची, खेळाडूंची तुलना करू नये म्हणतात. पण अहो मला सांगा, गल्ली क्रिकेटमध्ये १०० धावा काढणाऱ्या कोणा मुलाची आणि आंतरराष्ट्रीय सामन्यात ३०च्यावर शतके काढणाऱ्या सचिनची कोणत्या अंगाने तुलना होऊ शकते?

तसेच मला सांगा की २-३ वर्षे खपणारे संगीत देणाऱ्या आणि २-३ (किंवा अधिक) दशके श्रोत्यांच्या कानावर-हृदयावर अधिराज्य गाजवणाऱ्या संगीतकारांची कशी तुलना होऊ शकेल?

जुनं ते सर्वच सोनं असा हट्ट धरणे योग्य ठरेल असे वाटत नाही. जुन्या संगीतकारांनी आणि गायकांनी अशी अनेक गाणी दिली आहेत की जी लागताक्षणी पुढे टाकाविशी वाटतात. पण त्यांनीच दिलेली अनेक गाणी आज एकाच घरातल्या दोन-तीन-चार पिढ्या न कंटाळता ऐकत-गात-गुणगुणत आहेत. त्यामुळे त्या गीत-संगीतात नक्कीच काही उजवे आहे असे म्हणायला हरकत नाही.

===

थोडे आणखी-

व.पु. काळेंचं एक वाक्य आहे... "रुची सर्वांनाच असते, पण अभिरुची जोपासून तयार करावी लागते" या अर्थाचं.

ज्याला पुरणपोळीचा आस्वाद कसा घ्यायचा किंवा पुरणपोळीच माहीत नाही त्याला आई, बहीण, बायको या सर्वांची पुरणपोळी म्हणजे फक्त पुरणपोळी वाटणार. पण ज्याला पुरणपोळीचा आस्वाद घेता येतो तो तीनही प्रकारच्या पोळ्या पहिल्या घासातच ओळखेल असे वाटते.